१६ ते २० मार्चदरम्यान श्रीशैल देवस्थानात उगादी महोत्सव

Spread the news

१६ ते २० मार्चदरम्यान श्रीशैल देवस्थानात उगादी महोत्सव

­

 

मुंबई, दि. ४ : आंध्र प्रदेश शासनाच्या देवस्थान विभागाअंतर्गत असलेल्या श्रीशैल देवस्थान येथे उगादी महोत्सव १६ ते २० मार्च २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील काही भागांतून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असून सुमारे ७ ते ८ लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापैकी २ लाखांहून अधिक भाविक पायी ‘पदयात्रा’ करून क्षेत्री दाखल होणार आहेत.

  •  

उत्सव काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता देवस्थान प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ६ ते १६ मार्च या दहा दिवसांत भाविकांना ‘स्पर्श दर्शन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दर्शनात भाविकांना गर्भगृहात प्रवेश करून श्री मल्लिकार्जुन स्वामीवरू यांच्या ज्योतिर्लिंगाला कपाळ लावण्याची संधी मिळते.

या दहा दिवसांत दररोज चार सत्रांमध्ये दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक सत्रासाठी १५०० तिकिटे तत्काळ बुकिंगद्वारे आणि ५०० तिकिटे ऑनलाईन उपलब्ध असतील. अशा प्रकारे दररोज एकूण ८ हजार तिकिटे उपलब्ध राहतील.

मात्र १६ ते २० मार्च २०२६ या मुख्य उत्सव कालावधीत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्या दिवसांत केवळ ‘अलंकार दर्शन’ उपलब्ध राहील. या दर्शनात भाविकांना ज्योतिर्लिंगाचे केवळ दर्शन घेता येईल; स्पर्श दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. उत्सवाच्या शिखर दिवशी स्पर्श दर्शनासाठी ९ ते १२ तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थान प्रशासनाने सांगितले आहे. हा निर्णय दरवर्षीप्रमाणे यंदाही नियमित पद्धतीने लागू करण्यात येत आहे.

भाविकांच्या सोयीसाठी पदयात्रा मार्गावर विशेष व्यवस्था, निवाऱ्यासाठी प्रशस्त शेड्स, रांगेचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अन्नप्रसाद वितरण तसेच वाहनतळाची सोय करण्यात येत आहे.
देवस्थान प्रशासनाने सर्व भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ही माहिती विशेष दर्जाचे उपजिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी एम. श्रीनिवास राव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!