**सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया!**
सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली दुर्बीनीद्वारे बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. कोल्हापूरमधील 65 वर्षीय रुग्ण, जो दीर्घकाळापासून किडनी विकाराने त्रस्त होता आणि एक दिवस आड डायलिसिस घेत होता, त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने बायपास शस्त्रक्रिया अत्यावश्यक बनली.
सिद्धगिरी रुग्णालयाचे हृदयरोग व शस्त्रक्रिया विभाग प्रमुख **डॉ. सयाजीराव सरगर** यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही अत्यंत जटील शस्त्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आले. **दुर्बीनीच्या सहाय्याने इंटरनल मेमरी आर्टरी काढून, छातीच्या डाव्या बाजूस छोटा छेद देऊन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.**
**महाराष्ट्रातील पहिली दुर्बीनीद्वारे यशस्वी बायपास शस्त्रक्रिया!**
परंपरागत हृदय शस्त्रक्रियेत छातीच्या समोरील भागात मोठा छेद घेऊन स्टरनम नावाचे हाड कापून हृदयावर ऑपरेशन करावे लागते, ज्यामुळे रुग्णाला अधिक रक्तस्त्राव, वेदना आणि दीर्घकालीन विश्रांती आवश्यक असते. मात्र, **दुर्बीनीच्या सहाय्याने (Endoscopic or Minimally Invasive) बायपास सर्जरी केल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रक्तस्त्राव कमी होतो, वेदना कमी होतात आणि रुग्ण लवकर बरा होतो.**
याबाबत माहिती देताना **डॉ. सयाजीराव सरगर** म्हणाले, *”ही शस्त्रक्रिया केवळ तंत्रज्ञानाची नव्हे, तर सिद्धगिरी हॉस्पिटलच्या कौशल्याची आणि सेवाभावी वृत्तीची साक्ष देणारी आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे दुर्बीनीच्या सहाय्याने हृदय बायपास शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो.”*
सिद्धगिरी हॉस्पिटल हे **नफा-तोट्याच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवण्याच्या दृष्टीने कार्यरत आहे.** या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता हृदयाच्या जटील शस्त्रक्रिया कमी खर्चात आणि सुरक्षित पद्धतीने ग्रामीण भागात उपलब्ध होतील.
**पत्रकार परिषद व अधिक माहिती:**
या ऐतिहासिक यशाबद्दल पत्रकार परिषद घेण्यात आली, जिथे **परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामींजी, डॉ. सयाजीराव सरगर , डॉ. शिवशंकर मरजक्के , डॉ प्रकाश भरमगौडर (वैद्यकीय अधीक्षक ),विवेक सिद्ध ,विक्रम पाटील, राकेश पाटील, आकाश निलगार ,राजेंद्र शिंदे ,अमित गावडे. ** यांच्यासह हॉस्पिटलचे अन्य अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते.
ही प्रगत उपचारपद्धती सामान्य नागरिकांसाठी सहज उपलब्ध करून देण्याच्या सिद्धगिरी हॉस्पिटलच्या ध्येयाचा हा आणखी एक टप्पा आहे. ज्या रुग्णांना हृदयविकार व बायपास शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांनी याचा लाभ घ्यावा.