*डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या*
*सिद्धी राजाध्यक्षचे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णयश*
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी सिद्धी राजाध्यक्ष हिने फरीदाबाद (दिल्ली) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली. तिच्या या देदीप्यमान यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध देशांतील नामांकित व अनुभवी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये सिद्धीने सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर वर्चस्व सिद्ध केले. काता आणि कुमिते प्रकारत तिने दोन सुवर्ण पदके प्राप्त केली. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवास्पदरीत्या उज्ज्वल झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, विभागप्रमुख डॉ. तानाजीराव मोहिते-पाटील यांनी सिद्धीचे अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयीन जीवनात शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्टता साधता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण कु. सिद्धीने घालून दिले असून, तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.



