सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना गोकुळची मदतीचा हात
३२०० लिटर दुधाचे मोफत वाटप – सामाजिक बांधिलकीचे जतन
सोलापूर | २७ सप्टेंबर २०२५
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ व माढा तालुक्यातील अनेक गावे महापुराच्या पाण्याखाली गेली असून, पशुधन, घरे, दुकाने, फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव गायकवाड वस्ती, मनगोळी, माने वस्ती, गावडेवाडी, होनमुर्गी, वांगी, वडकबाळ, तेरेमैल आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव, तेलगाव तिरे, पाथरी, शिवनी या गावांना व वाड्या-वस्त्यांना सीना नदीच्या पुराचा तडाका बसला. अनेक ठिकाणी शेतात दहा-बारा फूट पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांना प्रशासनाने विविध शिक्षण संस्था, समाजमंदिरांमध्ये स्थलांतरित केले.
या स्थलांतरित छावण्यांमध्ये जाऊन गोकुळ दूध संघाच्या वतीने ६,४०० अर्धा-लिटर गाय दुधाच्या पिशव्या मोफत वाटप करण्यात आल्या. लहान बाळे, वयोवृद्ध तसेच दैनंदिन चहा-पाण्यासाठी दूध आवश्यक असते; मात्र महापुरामुळे पशुधनाचे मोठे नुकसान होऊन दूध पुरवठा कमी झाला. या पार्श्वभूमीवर गोकुळने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.
पूरग्रस्तांनी भावना व्यक्त केली की, “आणीबाणीच्या किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गोकुळ सारख्या एका सहकारी दूध संघाने केलेली मदत आमच्या मनात कायम स्मरणात राहील.”
दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अभिजीत नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे वाटप पार पडले. या वेळी ब्रह्मदेव माने शिक्षण संकुलाचे संचालक पृथ्वीराज माने, तिरे गावचे गोवर्धन जगताप, रामकाका जाधव, मनगोळी गावचे सरपंच संजय गायकवाड, उपसरपंच मधुकर कांबळे, प्रगतशील शेतकरी हरिदास जमादार, विठ्ठल घंटे, बालाजी घंटे, प्रशासकीय अधिकारी नासिर पठाण, दक्षिण सोलापूरचे तलाठी श्री. कोकरे, पुरवठा व निरीक्षण अधिकारी निखिल महानोर, सोलापूर गोकुळ डिस्ट्रीब्यूटर रवी मोहिते, संग्राम सुरवसे, मोहन चोपडे, निलांजन चेळेकर तसेच पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोकुळ दूध संघाच्या वतीने , केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला असून गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.