दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी *सीए आशिष सेवेकरी*
कोल्हापूर: दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया (आय.सी.ए.आय.) कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी सीए आशिष सेवेकरी, तर उपाध्यक्षपदी सीए अलोक शाह यांची निवड झाली आहे.
आयसीएआय कोल्हापूर शाखेची कार्यकारिणी समितीची बैठक दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ICAI भवन येथे संपन्न झाली. या बैठकीत २०२६-२७ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये सचिवपदी सीए राघवेंद्र बकरे, कोषाध्यक्षपदी सीए निखील देवणे, तर स्टुडंट्स असोसिएशनच्या (WICASA) अध्यक्षा म्हणून सीए प्रीती पाचोरे यांची निवड झाली. नूतन अध्यक्ष सीए आशिष सेवेकरी यांनी सीए नितीन हरगुडे यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
यावर्षीच्या कार्यकाळासाठी सीए आशिष सेवेकरी यांनी “SYNERGY – एकत्रितपणे नवनवीन शिखरे पादाक्रांत करूया” ही विशेष संकल्पना (Theme) निश्चित केली आहे.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष सीए आशिष सेवेकरी म्हणाले, “ICAI च्या WIRC अंतर्गत कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना माझे ठाम मत आहे की, आपली खरी ताकद फक्त आपल्या वैयक्तिक कौशल्यात नसून आपल्या सामूहिक एकजुटीत आहे. याच ‘सिनर्जी’च्या जोरावर आपण व्यावसायिक, नोकरदार वर्ग, मध्यम व लघु उद्योजकांना येणाऱ्या आयकर व वस्तू आणि सेवा कर (GST) विषयक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू. त्याचबरोबर युवा सीए सभासद आणि विद्यार्थी यांच्या कौशल्य विकासालाही प्राधान्य दिले जाईल. लोकांच्या आर्थिक साक्षरतेसाठी विविध उपक्रमांमार्फत काम करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आयसीएआय कोल्हापूर शाखेची स्थापना १९८१ मध्ये झाली असून, संस्थेशी ७०० हून अधिक सीए सभासद आणि २५०० विद्यार्थी संलग्न आहेत.
सीए अभ्यासक्रम किंवा इतर माहितीसाठी ‘आयसीएआय भवन’, दाभोलकर कॉर्नर, कोल्हापूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शाखेतर्फे करण्यात आले आहे.



