ही प्रशासकीय पडताळणी प्रक्रिया – चेअरमन नवीद मुश्रीफ
चौकशी समितीला गोकुळमार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल
कोल्हापूर : प्रतिनिधी
गोकुळ दूध संघातील सभासद संस्थांबाबत सुरू असलेल्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर गोकुळची भूमिका स्पष्ट करत चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणात नेमण्यात आलेली समिती ही पूर्णपणे प्रशासकीय पडताळणी प्रक्रिया आहे.
ते म्हणाले, “या समितीचा उद्देश संस्थांची नोंदणी, सभासद प्रक्रिया व त्यांच्या कामकाजाबाबत वस्तुनिष्ठ माहिती संकलित करणे आणि लागू असलेल्या नियमांनुसार पडताळणी करणे हा आहे. या प्रक्रियेला कोणत्याही प्रकारची आरोपात्मक किंवा गुन्हेगारी चौकशी असे स्वरूप देणे योग्य नाही.”
पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, काही ठिकाणी या प्रक्रियेबाबत चुकीचा अर्थ लावून गोकुळ दूध संघाबाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. “प्रत्यक्षात ही प्रशासकीय स्वरूपाची पडताळणी आहे. गोकुळ दूध संघाचे कामकाज हे नेहमीच शासन नियम व कायदेशीर तरतुदींच्या चौकटीत राहून पार पडलेले आहे. त्यामुळे या प्रक्रियेबाबत कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, गोकुळ प्रशासन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व माहिती, कागदपत्रे व सहकार्य वेळोवेळी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. “चौकशी समितीला गोकुळमार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. या पडताळणीनंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल आणि सर्व बाबी पारदर्शकपणे समोर येतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, संबंधित समितीकडून अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. सभासदांनी अपूर्ण किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही चेअरमन मुश्रीफ यांनी केले.





