*तुम्ही पाठीशी नसता तर माझा राजकीय उदय झाला नसता*
*मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक ऊद्गार*
*कागलमध्ये संजय गांधी योजनेच्या २३५ लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप*
*कागल, दि. १०:*
तुम्ही गोरगरीब जनता माझ्या पाठीशी नसता तर माझा राजकीय उदयच झाला नसता, असे भावनिक उदगार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. संपूर्ण आयुष्यभर गोरगरिबांची सेवा करीत राहीन, असेही ते म्हणाले.
कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या २३५ लाभार्थ्यांच्या पेन्शन मंजुरीपत्र वाटप कार्यक्रमात मंत्री श्री. बोलत होते. अध्यक्षस्थानी कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेची संचालक प्रताप उर्फ भैया माने होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गोरगरिबांच्या व्यथा आणि वेदना मी जवळून बघत आलो आहे. त्यामुळेच उपचाराअभावी मरण यातना भोगणा-या गोरगरीब रुग्णांसाठीच कायदा केला. गोरगरिबांच्या या आशीर्वादावरच तब्बल सलग सहावेळा विजयी झालो, असेही ते म्हणाले. निराधार योजनेतील पात्रतेसाठी वयोमर्यादा ६५ वरून ६० करणे, दरमहा दीड हजारांची पेन्शन दोन हजार करणे आणि उत्पन्न मर्यादा २१ हजार रुपयांवरून ५० हजारापर्यंत वाढवणे, या तीन अटी शिथिल करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.
कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, मंत्री हसनसाहेब मुश्रीफ हे गोरगरीब, सामान्य, वंचित आणि दुर्लक्षित घटकांचे कार्यकर्ते आहेत. “भिऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे”, असा भक्कम आधार ते सर्वांनाच देतात. त्यांनी निराधार योजनेची सुरुवातीला ६० रुपये असलेली पेन्शन पुढे अडीचशे, सहाशे, एक हजार अशा टप्प्यांवरून आत्ता ती दरमहा दीड हजार रुपयांवर आणली आहे. दरमहा दोन हजार रुपये पेन्शनसाठी ते प्रयत्नशील आहेत.
*दिवाळी पाडव्याला रुग्णांचा स्नेहमेळावा…..!*
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गेली २५ वर्ष अव्याहतपणे रुग्णसेवा करीत आलो आहे. आजही दर आठवड्याला २५ ते ३० पेशंट घेऊन मी मुंबईला जातो. त्यांच्यावर शस्त्रक्रिया व उपचार झाल्यानंतर त्यांना सुखरूप आणून घरी सोडतो. रुग्ण माझ्याकडे आला आणि त्याला उपचार मिळाला नाही, असे एकही उदाहरण मिळणार नाही. अशाप्रकारे हजारो रुग्णांची सेवा केली आहे. दरवर्षीप्रमाणे या दिवाळी पाडव्यालाही रुग्णांचा स्नेहमेळावा घेणार आहोत.
यावेळी केडीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, नेताजीराव मोरे, संजय चितारी, नितीन दिंडे, राजू आमते, रणजीत सूर्यवंशी, सदाशिव तुकान, सुभाष भोसले, सातापा कांबळे, संजय ठाणेकर, सतीश घाडगे, अर्जुन नाईक आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले. प्रास्ताविक संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. सदाशिव तुकान यांनी आभार मानले.
…….
*कागल: येथील बहुउद्देशीय सभागृहामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप झाले. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैया माने व इतर प्रमुख मान्यवर.*
======