‘त्या’ उजळाईवाडीकरांना भक्तीच्या शक्तीरूपातून लाभले यश : शंभर मंगळवार पायी प्रवास करत श्री महालक्ष्मी चरणी नतमस्तक
उजळाईवाडी, ता. १९
भक्ती, सातत्य आणि आरोग्य यांचा संगम घडवत उजळाईवाडीतील संतोष कदम, विनायक बागणे, संजय फडतरे, धनाजी रायजादे या चौघांसह ५० ग्रामस्थांनी सलग १०० मंगळवार उजळाईवाडी ते कोल्हापूर श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरापर्यंत पायी प्रवास करून अनोखे उदाहरण घालून दिले आहे.
हा प्रवास मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटे सुरू झाला. कोणताही खंड न पडता १०० वा प्रवास मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ रोजी पूर्ण झाला.
भक्तीतून साधलेले आरोग्य आणि सातत्य
सुरुवातीला शरीरयष्टीसाठी पहाटे चालण्याचा संकल्प करणाऱ्या संतोष कदम, विनायक बागणे, संजय फडतरे व धनाजी रायजादे यांनी हा संकल्प भक्तीच्या शक्तीत रुपांतरित केला. दर मंगळवारी पहाटे ४.१५ वाजता क्रांती चौकातून प्रवास सुरू करून ५.३५ वाजता महालक्ष्मी मंदिरात पोहोचणे आणि दर्शनानंतर पुन्हा KMT ने उजळाईवाडीत परतणे, हा प्रवास सलग १०० आठवडे अखंड सुरू राहिला.
मंगलमय पूजनाचा सोहळा
१०० मंगळवारांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर श्रीपूजक नितीन मुनीश्वर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने महालक्ष्मी मंदिरात विशेष पूजा व आरती संपन्न झाली. तसेच येत्या २१ ऑगस्ट रोजी गुरुपुष्प अमृत योग निमित्त सायंकाळी सहा वाजता उजळाईवाडीत श्री महालक्ष्मी प्रतिमा पूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कोट
“दर मंगळवारी आम्ही ३.३० ला उठतो. ४.१५ ला निघून ५.३५ ला मंदिरात पोहोचतो. हा प्रवास आता आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.” — श्री. विनायक बागणे
“आरोग्यासाठी सुरू केलेली पायपीट भक्तीत रुपांतरित झाली. १०० मंगळवार न संपता पार पडले, हे खरेच अंबाबाईचे वरदान आहे.” — श्री. धनाजी रायजादे
महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथे सलग १०० मंगळवार पायी प्रवास करून श्री अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झालेले उजळाईवाडीकर.