*गृह विभागांतर्गत पीएसआय पदाच्या भरती प्रक्रियेतील कोटा रचना ५०:२५:२५ याप्रमाणं करावी*
*आमदार सतेज पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
*कोल्हापूर:* राज्य शासनाने, गृह विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदभरती प्रक्रियेतील कोटा रचना ही सुकाणू समितीने दिलेल्या आदेशानुसार ५०:२५:२५ याप्रमाणे करावी अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात पुढे नमूद केले आहे की, राज्य शासनाने गृह विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदभरती प्रक्रियेतील कोटा रचना संदर्भात २०२३ नंतर मागणीपत्र शासन स्तरावरून पाठविण्यात येवू नये. तसेच कोटा रचना ५०% सरळसेवा व ५०% पदोन्नतीने करण्यात यावी, असा शासन निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात फेर आढावा घेण्याकरीता सुकाणू समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने कोटा रचना ही पूर्वीप्रमाणेच म्हणजेच ५०% सरळसेवा, २५% पदोन्नती व २५% विभागीय परीक्षा याप्रमाणे ठेवण्यात यावी असे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच आपणांकडूनही सुकाणू समितीच्या आदेशाप्रमाणे पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश दिले असल्याचे समजते. परंतू त्यानुसार प्रशासकीय पातळीवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विभागीय परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या हजारो उमेदवारांमध्ये असंतोष व नाराजीची भावना निर्माण झालेली आहे याकडे आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधले. त्यामुळे यासंदर्भात सुकाणू समितीच्या आदेशाप्रमाणे कोटा रचनेस तातडीने मान्यता देऊन कोटा रचना पुन्हा ५०:२५:२५ प्रमाणे करण्याबाबतचा शासन निर्णय करणेत यावा व त्यानुसार विभागांतर्गत पीएसआय परीक्षा नव्याने जाहीर करावी अशी मागणी इच्छुक उमेदवारांकडून होत आहे. यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विशेष उल्लेखाची सूचना मांडल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.
- गृह विभागांतर्गत पीएसआय पदाच्या भरती प्रक्रियेतील ५०:२५:२५ कोट्याबाबत शासन निर्णयात फेरबदल करणेकामी संबंधितांना शासन स्तरावर योग्य ते निर्देश द्यावेत अशी विनंती आमदार सतेज पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.