Spread the news

*शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू नसने भूषणावह नाही*
*आमदार सतेज पाटील यांचा संताप: इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरू पद रिक्त*

 

 

  •  

*कोल्हापूर :* शिवाजी विद्यापीठाच्या 63 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरूपद रिक्त राहिले असून शिक्षण क्षेत्रासाठी हे भूषणावह नाही या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर 2025 रोजी संपला असतानाही 9 ऑक्टोबरपर्यंत नवीन प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली नसल्याने आमदार पाटील यांनी ट्विट करून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
आमदार पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 11(8) नुसार, राज्यपाल तथा कुलपती यांनी तत्काळ प्रभारी कुलगुरू नेमणे अपेक्षित असते. मात्र, अद्याप कोणताही आदेश निघाला नाही. विद्यापीठ प्रशासन संभ्रमात आहे. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरू पद रिक्त राहणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का? शिक्षणाबाबतची ही अनास्था महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांप्रती अन्याय आहे. ज्या दिवशी कुलगुरूंची निवड होते, त्याच दिवशी त्यांच्या कार्यकाळाची समाप्ती तारीख ठरलेली असते. मग वेळेवर पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया का झाली नाही? आणि किमान प्रभारी कुलगुरूसुद्धा का नेमण्यात आले नाहीत? या सर्व परिस्थितीमुळे विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. राज्यपाल कार्यालय व उच्च शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.

*चौकट :* कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र
कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र आमचा?” असा उद्विग्न सवाल उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!