डॉ. देवानंद शिंदे, अनिता शिंदे यांना ‘यशवंत-वेणू सन्मान’ पुरस्कार

Spread the news

डॉ. देवानंद शिंदे, अनिता शिंदे यांना
‘यशवंत-वेणू सन्मान’ पुरस्कार
कोल्हापूर, दि. ९ मार्च: शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. देवानंद शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. अनिता शिंदे यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (पिंपरी चिंचवड विभाग) यांच्या वतीने देण्यात येणारा ‘यशवंत-वेणू सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले यांनी यांनी पत्राद्वारे ही माहिती कळविली आहे.
चिंचवड येथील सायन्स पार्कसमोरील ऑटो क्लस्टर सभागृहात येत्या गुरूवारी (दि. १२ मार्च) दुपारी ४ वाजता पुरस्कार प्रदान सोहळा होईल. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार असतील. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असलेले कृषी, शैक्षणिक, सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात समाजाचे प्रबोधन करीत असताना समाजमन समृद्ध करणारे व्यासंगी व्यक्तीमत्त्व आम्हास आपणामध्ये दिसले. त्याचप्रमाणे समाज परिवर्तन करीत असताना आपली सावली बनून आपणास आयुष्याची साथ देणाऱ्या आपल्या सहचारिणी यांच्या व्यक्तीमत्त्वात आम्हाला वेणूताईच दिसतात. म्हणूनच त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपणा उभयतांचा गौरव करीत आहोत, असे सदाफुले यांनी पत्रात म्हटले आहे.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!