बारावी परीक्षेत कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय

Spread the news

बारावी परीक्षेत कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी –मार्च २०२५ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.६४ टक्के इतका लागला. निकालात संपूर्ण राज्यात कोल्हापूर विभाग द्वितीय स्थानावर आहे.
या विभागाच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत ०.६० टक्क्यांनी इतकी घट आहे. गेल्या वर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ९४.२४ टक्के इतका होता.

कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक उपसंचालक स्मिता गौड, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, बोर्डाच्या कोल्हापूर विभागाचे सहसचिव बी. एम. किल्लेदार आदी उपस्थित होते.

  •  

कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यातील १०१२ कनिष्ठ महाविद्यालयातील १७६ केंद्रावर परीक्षा झाली. तीन जिल्ह्यात मिळून एक लाख १ ३ हजार १९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी एक लाख सहा हजार चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल हा ९४.४० टक्के इतका आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ४८ हजार ८३६ विद्यार्थी प्रविष्ठ होते, त्यापैकी ४६ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सांगली जिल्ह्यात ३१ हजार २०२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या २९ हजार १४५ इतकी आहे. सांगली जिल्हयाचा एकूण निकाल ९३.३९ टक्के आहे. सातारा जिल्ह्यातील परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३३ हजार १५२ आहे. यापैकी उत्तीर्ण विद्यार्थी ३० हजार ७५४ आहेत. सातारा जिल्हयाचा निकाल ९२.७६ टक्के आहे.

………

गैरप्रकारमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने सुरू केलेला अभिनव पॅटर्न, त्यास शाळांकडून मिळालेला प्रतिसाद, परीक्षक- नियमकांसह क्षेत्रीय यंत्रणांचे सहकार्य तसेच विभागीय मंडळातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परीक्षा पूर्वकाळात, परीक्षा काळात व परीक्षोत्तर काळात अहोरात्र मेहनत घेतली. सर्व कामे म्हणजे परीक्षा सुरळीत पार पाडणे व परीक्षेनंतर निकालाची कामे पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. एकंदरीत सर्वांच्या प्रयत्नामुळे बारावीचा निकाल सुधारण्यास व वेळेत लागण्यासाठी मदत झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागीय मंडळाने चौथ्या वरून दुसऱ्या स्थानावर राज्यात झेप घेतली आहे. शिवाय राज्यात पहिल्यांदाच मे च्या पहिल्या आठवड्यात निकाल लागल्याने हाही विक्रम झाला आहे.

– राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर मंडळ


Spread the news

You may also like

error: Content is protected !!