२० ते ३० एप्रिल दरम्यान पासपोर्ट मोबाईल व्हॅन सेवेचे आयोजन
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : पासपोर्ट अपॉइंटमेंट लवकर उपलब्ध करुन देणे व पासपोर्ट सेवेमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) पुणे यांच्यामार्फत पिंपरी येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रात (POPSK) येथे दि .२० ते ३० एप्रिल या कालावधीत विशेष ‘पासपोर्ट मोबाईल व्हॅन’ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कागदपत्रे: ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी प्रौढ आणि अल्पवयीन अशा दोन्ही अर्जदारांसाठी दिलेल्या चेक लिस्ट काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्जदाराची सत्यता तपासण्यासाठी, पारपत्र कायदा १९६७ चा कलम ५ आणि पारपत्र नियम १९८० चा नियम ५ नुसार, अर्जाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पारपत्र प्राधिकरण आवश्यक वाटेल अशी अतिरिक्त माहिती, कागदपत्रे सादर करण्यास अर्जदाराला मागू शकतात.
मोबाईल व्हॅनसाठी अपॉइंटमेंट पुढीलप्रमाणे बुक करावी:
पासपोर्ट इंडियाच्या https://www.passportindia.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून सामान्य योजनेंतर्गत संबंधितांनी आपला अर्ज सादर करावा. ऑनलाइन पैसे भरल्यानंतर, ‘अपॉइंटमेंट निश्चित करा’ या पृष्ठावर जावून ‘मोबाइल व्हॅन’ हे स्थान निवडावे आणि अपॉइंटमेंट बुक करावी.
पासपोर्ट मोबाईल सेवा केंद्राचे दिनांक व ठिकाण पुढीलप्रमाणे : – २० ते ३० एप्रिल या कालावधीत पिंपरी पोस्ट ऑफिस, हिंदुस्तान एंटीबायोटिक्स समोर, जुना पुणे मुंबई महामार्ग, खराळवाडी, पुणे- ४११०१८ येथे सकाळी ८:३० ते सायंकाळी ६ या दरम्यान अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज पावतीवर नमूद केलेल्या त्यांच्या नियोजित भेटीच्या वेळी १५ मिनिटे अगोदर उपस्थित रहावे.




