Spread the news

गझल सम्राट जगजितसिंग यांच्या जीवन व गायन प्रवासाचा सुरेल जागर ; डॉ. प्रवीण चौगले यांनी केले गझल सादरीकरण
कोल्हापूर, दि. १ जुलै : डॉ. सुनीलकुमार लवटे विचारमंच, कोल्हापूर यांच्या मासिक सभेत ‘गझल सम्राट जगजितसिंग : जीवन व गायन प्रवास’ या विषयावर प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले यांनी अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि सुरेल सादरीकरण करून उपस्थितांना गझलविश्वाची अविस्मरणीय सफर घडवून आणली. गझल सम्राट जगजितसिंग यांनी आपल्या मृदू, भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी आवाजातून गझल गायकीला नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या गायनात शब्दांचा अर्थ, भावनांची उत्कटता आणि गझलेचा आशय यांना विशेष महत्त्व असून भारतीय शास्त्रीय संगीत आणि आधुनिक वाद्यसंगीताचा सुंदर संगम त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात अनुभवायला मिळतो. प्रेम, विरह, आठवणी, वेदना आणि जीवनातील विविध भावछटा त्यांनी आपल्या गझलांमधून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केल्या, असे प्रतिपादन डॉ. प्रवीण चौगले यांनी केले.
मंचाचे अध्यक्ष डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत डॉ. चौगले यांनी जगजितसिंग यांच्या बालपणापासून ते जागतिक कीर्तीचे गझल गायक होईपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलगडून सांगितला. राजस्थानातील श्रीगंगानगर येथे जन्मलेल्या जगजितसिंग यांचे मूळ नाव जगमोहन सिंह होते. सुरुवातीला सरकारी अधिकारी व खेळाडू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जगजितसिंग यांची संगीताची ओढ ओळखून त्यांच्या वडिलांनी त्यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले. पंडित छगनलाल शर्मा आणि उस्ताद जमाल खान यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे घेतले. आकाशवाणी जालंधरमधील सुरुवातीच्या कामानंतर मोठी स्वप्ने घेऊन ते मुंबईत आले. संघर्षाच्या काळात जाहिरातींसाठी जिंगल्स गायले, त्यानंतर चित्रपटसृष्टीत आणि स्वतंत्र गझल गायनात त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
चित्रा सिंह यांच्याशी झालेली भेट, दोघांचे वैवाहिक आयुष्य, एकत्रित गझल गायन आणि भारतीय संगीतविश्वात त्यांनी निर्माण केलेला नवा प्रवाह याचाही त्यांनी उल्लेख केला. १९९० मध्ये मुलगा विवेक यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या आयुष्यात आलेल्या दुःखद प्रसंगाने त्यांच्या गायनावर झालेला परिणामही त्यांनी भावनिक शब्दांत मांडला. या दुःखातून सावरत त्यांनी पुन्हा संगीताकडे वळून अनेक अजरामर गझला रसिकांना दिल्या. भारतात स्वतंत्र गझल अल्बमची लोकप्रियता वाढविण्यात जगजितसिंग आणि चित्रा सिंह या दाम्पत्याचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
व्याख्यानादरम्यान डॉ. चौगले यांनी ‘होंठों से छू लो तुम’, ‘तुमको देखा तो ये खयाल आया’, ‘प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है’, ‘तेरे आने की जब खबर महके’, ‘तेरी खुशबू से सारा घर महके’ या लोकप्रिय गझला आपल्या सुरेल आवाजात सादर केल्या. प्रत्येक गझलेचा अर्थ, तिच्यामागील भावना आणि संगीतवैशिष्ट्ये उलगडून सांगत त्यांनी केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.  काही काळ अक्षरशः गझलमय वातावरण निर्माण झाले होते.
प्रा. निशांत गोंधळी आणि डॉ. विश्वास सुतार यांनी डॉ. चौगले यांच्या सादरीकरणाचे रसग्रहण करताना त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीचे, गझल गायनातील भावस्पर्शी शैलीचे आणि विषयावरील प्रभुत्वाचे विशेष कौतुक केले. त्यांनी जगजितसिंग यांच्या गझलांतील शब्दसौंदर्य, संगीत आणि जीवनदृष्टी यांचा उत्कृष्ट संगम उपस्थितांसमोर उभा केल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विचारमंचाचे सचिव प्रा. सी. एम. गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून मागील सभेचे इतिवृत्त सादर केले. कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले यांच्या घरी सुबकपणे पार पडले.
या प्रसंगी डॉ. सुनीलकुमार लवटे, प्राचार्य डॉ. जी. पी. माळी, प्राचार्य इस्माईल पठाण, दीपक जगदाळे, प्रा. टी. के. सरगर, अमेय जोशी, मिलिंद यादव, चंद्रकांत निकाडे, संजय कळके, प्रकाश ठाणेकर, विजय एकशिंगे, महेश सूर्यवंशी, संदीप मगदूम, के. एस. पाटील यांच्यासह विचारमंचाचे सदस्य आणि गझलप्रेमी उपस्थित होते. माहितीपूर्ण व्याख्यान, सुरेल गझल गायन आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे विचारमंचाची ही मासिक सभा संस्मरणीय ठरली.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!