*महिलांमधील कर्करोगाचा शोध घेणारा ‘स्मार्ट बझर’ विकसित*
डी. वाय. पाटील विद्यापीठाचे संशोधन, एआय तंत्रज्ञानाचा वापर
कोल्हापूर :
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणणारे संशोधन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांनी केले आहे. या संशोधकांनी महिलांमधील अंडाशयाचा कर्करोग (Ovarian Cancer) प्रारंभिक टप्प्यातच ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ‘स्मार्ट बझर’ नावाचे अभिनव उपकरण विकसित केले असून, हे संशोधन महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरणार आहे.
विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डीसीप्लेनरी स्टडीजच्या स्टेम सेल आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन तसेच मेडिकल बायोटेक्नॉलॉजी विभागातील प्रा. अर्पिता पांडे तिवारी यांच्या नेतृत्वाखाली संशोधक विद्यार्थी प्रणोती कांबळे आणि सोहेल शेख यांनी हे अत्याधुनिक उपकरण तयार केले आहे. या सर्वाना रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या ‘स्मार्ट बझर’मध्ये एआय तंत्रज्ञानासोबत कार्बन क्वांटम डॉट्स या नॅनोमटेरियल्सचा वापर करण्यात आला आहे. शरीरातील जैविक द्रवांमधील सूक्ष्म बदल ओळखून हे उपकरण संभाव्य कर्करोगाचे संकेत काही सेकंदांत शोधते. पारंपरिक तपासणी पद्धतींपेक्षा हे साधन अधिक वेगवान, संवेदनशील आणि तुलनेने कमी परवडणारे आहे.
या उपकरणाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ते मोबाइल अॅप किंवा इतर स्मार्ट डिव्हाइसशी सहज जोडता येते. महिलांच्या आरोग्य तपासणीदरम्यान हे साधन काही क्षणांत बायोसिग्नल्सचे विश्लेषण करून कर्करोगाची लवकर सूचना देते. त्यामुळे कर्करोगाचा प्रारंभिक टप्प्यातच शोध घेऊन योग्य वेळी उपचार सुरू करता येतात, ज्यामुळे मृत्यूदरात घट घडवून आणणे शक्य होणार आहे.
या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात उद्योग सहकार्य आणि क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत. यामुळे ग्रामीण भागातील महिलांनाही अत्याधुनिक निदान सुविधा परवडणाऱ्या खर्चात उपलब्ध होऊ शकतील. सध्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रक्त तपासण्यांना वेळखाऊ आणि खर्चिक आहेत. पण या एआय-आधारित तंत्रज्ञानामुळे निदानाची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे.
प्रा. अर्पिता तिवारी म्हणाल्या, महिलांमध्ये कर्करोगाचे लवकर निदान होणे हे मृत्यूदर कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहे. आमचे उद्दिष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि आरोग्यदायी जीवन देणे हेच आहे. हे उपकरण वापरण्यास सोपे असून, देशातील महिलांच्या आरोग्यरक्षणासाठी एक नवे पाऊल ठरेल.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांनी या संशोधनाबद्दल सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे.