*नामदार अजितदादा पवार यांचा अस्थीकलश आज कोल्हापुरात*
*सकाळी नऊपासून अस्थीकलशाचे दर्शन*
*कोल्हापूर, दि. १:*
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांचा अस्थीकलश आज सोमवार दि. २ कोल्हापुरात येत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत अस्थीकलश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मार्केट यार्डातील कार्यालयासमोर दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे. सर्वपक्षीय कै. अजितदादाप्रेमी नागरिकांनी अस्थिकलशाच्या दर्शनासाठी सकाळी नऊनंतर उपस्थित रहावे. सायंकाळी चार वाजता श्री. क्षेत्र प्रयाग चिखली येथील पवित्र संगमावर अस्थी विसर्जित केल्या जाणार आहेत. तसेच; सायंकाळी पाच वाजता मिरजकर तिकटी येथील दैवज्ञ बोर्डिंगमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर आणि शहराध्यक्ष आदिल फरास यांनी ही माहिती दिली.
स्वर्गीय उपमुख्यमंत्री नामदार कै. अजितदादा पवार आणि कोल्हापूर शहराचे ऋणानुबंध घट्ट होते. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरातच झाले होते. त्यांच्या बहिण आणि आत्याही कोल्हापुरातच. कोल्हापूर म्हटलं की त्यांनी विविध योजना आणि विकासनिधीमधून रस्ते, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा यासाठी या शहराला आजवर भरभरून निधी दिला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी त्यांनी निधी दिला. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय या शहराचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही, ही त्यांची कायमचीच ठाम भूमिका. या भूमिकेवर ते कायम सकारात्मक राहिले. कोल्हापूर महानगरपालिकेला त्यांनी एल. बी. टी. मधूनही मोठ्या प्रमाणात अनुदान दिले.
अजितदादा पाटबंधारे मंत्री असताना राजर्षी छत्रपती शाहूकालीन वैभव असलेला रंकाळा तलाव केंदाळाने गच्च भरलेला होता. एके दिवशी अजितदादांनी संपूर्ण एक दिवसभर जोडण्या लावून त्यानंतर आपल्या पाटबंधारे खात्यासह स्थानिक लोकशक्तीची मदत घेत रंकाळा केंदाळमुक्त केला होता. त्यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षी शाहू मैदानासाठी निधी दिला होता. त्यातूनच ते विकसित झाले होते. त्यानंतर अलीकडच्या काळात नाट्यगृहाला आग लागल्यानंतर नूतनीकरणासह परिसर विकासासाठी कोट्यावधींचा निधी दिला. या कामाची स्वतः पाहणी करून त्याची दर्जा आणि गुणवत्ता तपासण्यापर्यंत त्यांचे बारकाईने लक्ष होते. शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शैक्षणिक उठावासाठीही त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी विद्यापीठाला दिला होता. तसेच; शासकीय राजाराम महाविद्यालय आणि चित्रनगरीच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. कसबा बावडा येथे साकारलेली जिल्हा व सत्र न्यायालयाची आखीव रेखीव प्रशस्त इमारत ही त्यांच्याच दूरदृष्टीची प्रचिती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरणासह वाढत्या कोल्हापूर शहराला एका सुसज्ज व अद्ययावत कन्व्हेन्शन सेंटरची गरज ओळखून त्यासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर केला आहे. कोल्हापूर शहराच्या एकूणच विस्तारवाढीमुळे महापालिकेची प्रशासकीय इमारत अपुरी पडत आहे. त्यावर पर्याय म्हणून अजितदादांनी शेंडा पार्कमध्ये सुसज्ज व अद्ययावत अशा नव्या महापालिका प्रशासकीय इमारतीचा पर्याय सुचविला होता. नागरिकांना सर्व सेवासुविधा एकाच छताखाली मिळाव्यात, ही त्यांची भावना होती. त्यासाठी तीन एकर जागेऐवजी पाच एकर जागा द्या, अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. कृषी विद्यापीठाच्या नव्या इमारतीसाठीही त्यांनी मंजुरी दिली आहे.
■ महत्त्वाचे मुद्दे…….!
□ करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाई देवीवर अजितदादांची गाढ श्रद्धा. या मंदिराचा तीर्थस्थळ आराखडा बनवण्याची मूळ संकल्पनाही त्यांचीच. त्या संकल्पनेतूनच त्यांनी मंदिराचा रू. १४७० कोटींचा तीर्थस्थळ विकास आराखडा बनवून आर्किटेकचीही नेमणूक झाली होती.
□ गोरगरिबांची आरोग्यदायीनी असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सी. पी. आर. च्या नूतनीकरणासाठी शेकडो कोटींचा निधी दिला. शेंडा पार्कमध्ये साकारत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ११०० बेड्सचे हॉस्पिटल आणि विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या सोयीसाठी होस्टेल व इतर अनुषंगिक सोयीसुविधांसाठी हजारो कोटींचा निधी दिला आहे.
□ कोल्हापूर शहराचा स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी त्यांनी काळमवाडी धरणातून थेट पाईपलाईनची संकल्पना वास्तवात आणली. त्यासाठी त्यांनी ५२५ कोटींचा निधीही दिला. सासने मैदानावरील एका कार्यक्रमात तर त्यांनी “कोल्हापूरला काळमवाडी धरणातून थेट पाईपलाईनमधून स्वच्छ आणि मुबलक पाणी न दिल्यास पवारांची अवलाद सांगणार नाही” अशी आव्हानात्मक हमी दिली. ती आजही आदराने चर्चिली जाते.
=========



