कृत्रिम बुध्दिमत्ता साधनांचा वापर करताना सजग राहणे गरजेचे : प्रा.डॉ.रुपाली जैन
कोल्हापूर : कृत्रिम बुध्दिमत्ता मानवासारखे विचार करीत नाही.तर ते डेटाच्या आधारे भास निर्माण करू शकते.त्यामुळे कृत्रिम
बुध्दिमत्ता साधनाचा वापर करताना सजग राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाच्या गणित अधिविभागाच्या प्रा.डॉ.रुपाली जैन यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘आजची
नितीमत्ता:जबाबदार एआयचे वचन’ याविषयावर प्रमुख वक्ते म्हणून त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी संचालक डॉ.कृष्णा पाटील
होते.यावेळी सहा.प्राध्यापक,समन्वयक व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.
प्रा.डॉ.जैन म्हणाल्या की, सर चंद्रशेखर वेंकट रमण हे एक महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. ज्यांनी प्रकाशाच्या
विकीरणावरील संशोधनासाठी १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवले. त्यांनी शोधलेल्या 'रमण
परिणामा'च्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.त्यामुळे रमण यांचे विज्ञान क्षेत्रातील योगदान
अभ्यासणे महत्वाचे आहे.
आजच्या काळात विज्ञानातील संशोधनासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता महत्वाची भूमिका बजावत आहे. .विज्ञानातील
संशोधन करताना कृत्रिम बुध्दिमत्तेच्या विविध तंत्राचा वापर केला पाहिजे. त्यासाठी नोटबुक एल.एम.च्या आधारे आशय प्राप्त
करून संशोधनाला गती देवू शकतो. कृत्रिम बुध्दिमत्ता हे वास्तविक जगाशी काहीही संबंध नसताना तर्काच्या आधारे आपणाला
माहिती देण्याचे काम करते.त्यामुळे कृत्रिम बुध्दिमत्तेच्या आधारे मिळविलेली माहिती तपासून पाहणे ही आपली जबाबदारी
आहे.असे प्रा.डॉ.जैन यांनी सांगितले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री.दयानंद गावडे यांनी केले व पाहुण्यांची ओळख आणि आभार श्रीमती गंगा भोसले यांनी
मानले.





