जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने महिलांसाठी ठिकठिकाणी प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येत आहेत. या अंतर्गत शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालमीजवळ प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला परिसरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सत्कारही करण्यात आला. तसेच खाद्यमहोत्सव स्पर्धेतील विजेत्या महिलांना भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली.
धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरीत भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीम परिसरात महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. भागीरथीच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, नगरसेविका अर्चना कोराणे, पूर्वा राणे, धनंजय नामजोशी यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरवात झाली. ८ मार्च हा जागतिक महिला दिन महिलांच्या सन्मानासाठी बनवला गेला आहे. त्यामुळे या दिनाच्या निमित्ताने महिलांनी सक्षम, स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि उद्यमी बनण्याचा संकल्प करावा, असे आवाहन सौ. अरूंधती महाडिक यांनी केले. महिला आज सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने आपले कौशल्य आणि बुध्दीमत्ता सिध्द करत आहेत. आपणही आपल्या अंगभूत कौशल्यांचा वापर करून उद्योग आणि व्यवसाय सुरू करावा, त्यासाठी अर्थसहाय्य करायला भागीरथी पतसंस्था सज्ज असल्याचे सौ. महाडिक यांनी सांगितले. तर नगरसेविका अर्चना कोराणे आणि पूर्वा राणे यांनीही मनोगत व्यक्त करत, महिलांनी रोजच्या रगाडयातून बाहेर पडत, स्वतःकडे लक्ष देणे, आरोग्य जपणे, उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. दरम्यान परिसरातील ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त घेतलेल्या खाद्यमहोत्सव स्पर्धेतील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. त्यानंतर प्रशिक्षिका अश्विनी वास्कर यांनी महिलांना विविध पदार्थ आणि वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली. या शिबिराला स्नेहल कोराणे, स्वाती चव्हाण, संगीता चव्हाण यांच्यासह वेताळमाळ तालीम परिसरातील महिला उपस्थित होत्या.







