हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी चांगला पर्याय
खासदार धनंजय महाडिक
बांबू उद्योग परिषद-प्रदर्शन
कोल्हापूर : ‘शेतकऱ्यांचा खरा विकास घडविण्यासाठी आणि हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी बांबू लागवड हा प्रभावी आणि भविष्यवेधी पर्याय आहे, बांबू लागवड म्हणजे हिरवे सोने आहे,’ असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
शहाजी लॉ कॉलेजमध्ये जागतिक वन दिन आणि जलदिनानिमित्त बांबू उद्योग परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार महाडिक यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कौन्सिल ऑफ एज्युकेशन, देशभक्त रत्नाप्पा कुंभार मेमोरियल ट्रस्ट आणि पाटलोबा पाटील बांबू रिसर्च फाउंडेशनने आयोजन केले असून ही परिषद रविवारपर्यंत (ता. २२) आहे. कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम अध्यक्षस्थानी होत्या. संस्थेचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम प्रमुख उपस्थित होते. परिषदेसाठी उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सदस्य अॅड. वैभव पेडणेकर, अॅड. अमित बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
खासदार महाडिक म्हणाले, ‘जिल्ह्यात शेतीला पोषक हवामान, मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी बांबू लागवड करून पर्यावरण रक्षण, आर्थिक उन्नती साधावी. वातावरणात प्रचंड बदल होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशावेळी कमी खर्चात जास्त नफा मिळण्यासाठी बांबू
लागवड उपयुक्त ठरेल.’
उपवनसंरक्षक विलास काळे
म्हणाले, ‘बांबू लागवडीचा खर्चही कमी असून, दर चार वर्षांनी पीक हाती येते.’ पाटलोबा पाटील यांनी बांबू प्रक्रिया उद्योग, कार्बन क्रेडीट आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथेबाबत माहिती दिली. यानिमित्त भरलेल्या प्रदर्शनात बांबूची विविध उत्पादने मांडली आहेत.
परिषदेत विकास पाटील, डॉ. मानसिंगराव निंबाळकर, सुहास मोरे, गुरुप्रसाद बर्डे, योगेश शिंदे, गणपत गुरज, गोविंद भाईंडकर, वेदप्रकाश सोनी, गोविंद झंवर, विनोद पाटील, डॉ. चेतन नरके, रावसाहेब बडे, सुहास वायंगणकर यांनी विचार मांडले. ‘यशोगाथा’ सत्रात सुहास मोरे, श्याम सपाटे, प्रमोद कुमार, आनंदराव चौगुले, विलास जाधव, मकानदार यांनी यशकथा सांगितल्या. ‘बांबू प्रजातींची ओळख’ या सत्रात अशोक सातपुते, प्रशांत दाते, सतीश कांबळे यांनी बांबू प्रजातींची माहिती दिली.







