चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पत्रकार परिषदेबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण……
*माझी आणि आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांचे सगळे गैरसमज दूर होतील*
*वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण*
*आमदार श्री. पाटील यांना दूध संस्था नोंदणीची प्रक्रियाही सविस्तर समजावून सांगेन*
*कोल्हापूर, दि. १२:*
माझी आणि आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या मनातील सगळे गैरसमज, शंका- कुशंका आणि प्रश्न दूर होतील, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आमदार श्री. पाटील यांना दूध संस्था नोंदणीची प्रक्रियाही सविस्तर समजावून सांगेन, असेही ते म्हणाले.
याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता श्री. मुश्रीफ म्हणाले…..
□ गोकुळ दूध संघामध्ये आजघडीला महायुतीची सत्ता आहे.
यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार म्हणून मी, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, भाजपाचे माजी आमदार संजयबाबा घाटगे व इतर नेतेमंडळी आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमची याबद्दल सविस्तर चर्चा झालेली आहे. ही सगळी माहिती आमदार शिवाजीराव पाटील यांना कळाली की त्यांच्या सगळ्या शंकांचे आणि गैरसमजांचे निरसन होईल, अशी मला खात्री आहे.
□ चंदगडचे आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांची सोशल मीडियावर व्हिडिओ बघितला आणि मी आश्चर्यचकित झालो. कारण माझी आणि त्यांची गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत दोनवेळा सविस्तर चर्चा झालेली होती. ते असे का बोलले आहेत, हे ते मला भेटल्यानंतरच समजेल.
□ आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांची जी वक्तव्ये आहेत ते पाठीमागून त्यांना कुणीतरी चुकीचे “प्राॅम्टींग” करीत असल्यासारखे वाटते.
□ आमदार शिवाजीराव पाटील यांना मी समजावून सांगेन की, त्यांनी कागलसह करवीर, राधानगरी या तीन तालुक्यांचा उल्लेख केलेला आहे. कदाचित, या वातावरणामुळे सभासदांच्यात गैरसमज निर्माण होतील आणि आमदार शिवाजीराव पाटील जे उमेदवार देणार आहेत त्यांच्या मताधिक्यावरही परिणाम होऊ शकतो. ही गोष्टही मी त्यांना समजावून सांगणार आहे.
□ याबद्दल मा. उच्च न्यायालय आणि दुग्धविकास विभागाने एस. आय. टी. नेमलेली आहे. या सर्व चौकशीअंती “दूध का दूध आणि पाणी का पाणी” होईलच. न्यायालयात प्रत्यक्षात बाराशे दूध संस्थांची सुनावणी सुरू असताना, तो आकडा ३७०० सांगितल्यामुळे विनाकारण लोकांच्यात गैरसमज निर्माण होईल.
चौकट……..
मोठा गैरसमज……!
□ श्री. मुश्रीफ म्हणाले, आमदार शिवाजीराव पाटील यांचा मोठा गैरसमज झालेला दिसतोय. दूध संस्था नोंदणी करतानाची काय -काय प्रक्रिया असते, हे सुद्धा मी त्यांना समजावून सांगेन. सरकारी अधिकारी ही कोणतीही बेकायदेशीर गोष्ट करू शकत नाहीत. श्री. महेश कदम हे सहाय्यक निबंधक- दुग्ध कधीच नव्हते. माझ्या माहितीनुसार या दूध संस्थांची नोंदणी दुग्धचे सहाय्यक निबंधक श्री. गजेंद्र देशमुख आणि श्री. प्रदीप मालगावे यांच्या काळामध्ये झालेली आहे.
===========




