चित्रपट महामंडळाचा केला सर्वांगीण विकास
मेघराज राजेभोसले यांची माहिती
समर्थ पॅनलचा जोरदार प्रचार, उस्फुर्त प्रतिसाद
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून निर्मात्यांसाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था केली जाणार आहे. त्याशिवाय राज्यभरात पाचशे ठिकाणी मिनीथिएटर उभारण्याचा प्रयत्न आहे. महामंडळाच्या सभासद कामगारांचे किमान वेतन पंचवीस टक्क्यांनी वाढवणार असल्याची माहिती समर्थ आघाडीचे प्रमुख मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. समर्थ पॅनलला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून आपला विजय निश्चित असल्याचा विश्वासही राजे भोसले यांनी व्यक्त केला. विरोधकांनी सुरू केलेल्या खोट्या आरोपांचा त्यांनी समाचार घेतला.
सात जूनला महामंडळांची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी समर्थ आघाडीची भूमिका मांडली.
राजे भोसले म्हणाले, दहा वर्षात महामंडळाची चौफेर प्रगती केली ठेवी मोठ्या प्रमाणात वाढवल्या महामंडळाच्या मालकीच्या इमारती केल्या शाखांचा राज्यभर विस्तार केला. विविध समित्यांची स्थापना करून कामाचे विकेंद्रीकरण केले. बनावट ऑडिशनवर नियंत्रण आणले. कोल्हापूर चित्रनगरीतील विविध सुविधांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे
आता येथे विविध चित्रीकरणाच्या प्रकल्पांबरोबरच रोजगाराचीही निर्मिती होत आहे.
शालिनी सिनेटोनबाबत वेळीच पाठपुरावा केला. जयप्रभा स्टुडिओबाबतही सकारात्मक चर्चा सुरू आहे. मात्र, विरोधक जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत
आहेत.’
सभासदासाठी विविध योजना सुरू असल्याचे सांगून राजे भोसले म्हणाले, अभिनेता विक्रम गोखले यांनी दिलेल्या जागेवर कलाकारांसाठी वृद्धाश्रम उभारणे, विविध संस्थांशी समन्वयाने सभासदांना इतर मागनिही उत्पन्न मिळवून देणे, प्रत्येक जिल्हानिहाय महामंडळाची कार्यालये सुरू करणे, चित्रकर्मी, चित्रभूषण पुरस्काराबरोबरच विभागनिहाय पुरस्कार देणे, सर्व सभासदांचा आरोग्य व अपघात विमा उतरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही आघाडीने दिलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
उपाध्यक्ष धनाजी थमकर यांनी कोरोना काळात कलाकार, कामगार, तंत्रज्ञांसाठी केलेल्या मदतीची माहिती दिली.
अभिनेता सुशांत शेलार यांनी शासनाकडून मिळवलेल्या निधीची माहिती दिली. रवी गावडे यांनी विरोधी आघाडीतील उमेदवारांनी सभासदांची दिशाभूल करून कशी उमेदवारी मिळवली, याची माहिती दिली. राज काझी यांनी लेखकांना प्रोत्साहनपर विविध उपक्रमांची माहिती दिली. संजय ठुबे यांनी महामंडळाचा कारभार चोख असल्यानेच विरोधक एकही आरोप सिद्ध करू शकलेले नाहीत, असे सांगितले. यावेळी दीपक कदम, प्रवीण पाटील, शरद चव्हाण, विकास तोरणे आदी उपस्थित होते.





