*शाहू कारखान्यात जैविक कीड व्यस्थापनसाठी शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षण उत्साहात*
*लखनऊच्या भारतीय ऊस संशोधन संस्था व शाहू साखर कारखान्याचा संयुक्त उपक्रम*
कागल, प्रतिनिधी :
ऊस पिकातील किडींचे कमी खर्चात, पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने नियंत्रण करता यावे, या उद्देशाने लखनऊ येथील भारतीय ऊस संशोधन संस्था आणि श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने “ऊस पिकातील किडींचे जैविक पद्धतीने नियंत्रण” या विषयावरील मार्गदर्शनपर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात म्हणाले की,ऊसासह सर्वच पिकांवर वाढत चाललेला किडींचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे उत्पादनात होणारी घट ही शेतीसमोरील गंभीर समस्या आहे. या समस्येवर केवळ रासायनिक उपायांवर अवलंबून न राहता संशोधन संस्था, साखर कारखाने आणि शेतकरी यांनी एकत्रितपणे जैविक कीड नियंत्रणाच्या पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे.
ते पुढे म्हणाले, जैविक पद्धतीने कीड नियंत्रण केल्यास खर्च कमी होतो, जमिनीची सुपीकता आणि पोत अबाधित राहतो तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. मित्रकिडींचे संवर्धन आणि संरक्षण केल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होऊन ऊस उत्पादन अधिक सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जैविक उपाययोजनांना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रशिक्षणामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. अक्ष कुलकर्णी यांनी आभार मानले.
चौकट
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ‘शाहू’चे शेतकऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन – जितेंद्र चव्हाण
कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी संशोधन केंद्रातील आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची दूरदृष्टीपूर्ण परंपरा निर्माण केली. ही परंपरा आजही कायम ठेवत कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धती आणि मार्गदर्शनसाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. यामुळे ऊस उत्पादन वाढण्यासह उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.




