ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे समरजितसिंह घाटगे यांची मागणी: मराठा इतिहास जतनासाठी आराखडा

Spread the news

मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे जपणुकीसाठीच्या धोरणात्मक आराखड्यासाठी पुढाकार घ्या-केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया महाराज यांच्याकडे राजे समरजितसिंह घाटगेंची मागणी

­

 

नवी दिल्लीत भेट घेत राजघराण्यांच्यावतीने सादर केले निवेदन

  •  

कागल,प्रतिनिधी.
मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे वस्तुनिष्ठ आणि सर्वसमावेशक चित्रण जपण्यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी नवी दिल्ली येथे भेट घेत महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले.प्रादेशिकवादाच्या प्रभावाकरीता इतिहासाचा मूळ गाभा पुसला जाऊ नये, यासाठी केंद्र सरकारने व्यापक धोरणात्मक आराखडा तयार करावा आणि त्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी राजघराण्यांच्यावतीने घाटगे यांनी त्यांच्याकडे केली.
याबाबत अधिक माहिती अशी.
अलीकडेच एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतील १८व्या शतकातील मराठा साम्राज्याच्या नकाशासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन सादर करण्यात आले.या नकाशाचा उद्देश कोणत्याही प्रादेशिक वा राजवंशीय भावना दुखावणे नसून विद्यार्थ्यांना भारतीय इतिहासाची अधिक सखोल आणि संतुलित समग्र माहिती मिळावी,असा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेल्या ‘स्वराज्य’ या संकल्पनेचा उल्लेख करत सुमारे १५० वर्षांच्या कालखंडाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. या काळात भारताने अनेक लोक कल्याणकारी राजे महाराजांच्या स्वदेशी शासनाचा अनुभव घेतला असून स्वाभिमान, प्रतिकार आणि सांस्कृतिक आत्मविश्वास यांचे प्रतीक म्हणून या कालखंडाची नोंद आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
संबंधित नकाशा पूर्णपणे वगळल्यास भावी पिढ्या महत्त्वाच्या ऐतिहासिक ठेव्याच्या माहितीपासून वंचित राहतील,अशी चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच नकाशातील सीमा या केवळ अंदाजित असून त्या ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट करण्यापुरत्याच वापरण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या मागणीची दखल घेत केंद्र सरकारकडे इतिहासाचे संतुलित जतन करण्यासाठी पाठपुरावा करु,अशी ग्वाही मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया महाराज यांनी दिली.

हे निवेदन छत्रपती वसुंधराराजे भोसले सातारा,राजे समरजितसिंह घाटगे कागल सिनियर,विशालसिंग जडेजा मौरवी, उपेंद्रसिंह सरीला,नीलराजे बावडेकर पंत अमात्य कोल्हापूर,दीपकबाबा शिंदे म्हैशाळ,पुष्पकसिंह चव्हाण,पद्माराजे गोपाळराव पटवर्धन मिरज,मोहिनी पेशवा-करकरे,राधिकाराजे गायकवाड बडोदा,नंदिताराजे प्रवीणसिंह घाटगे कागल सीनियर, शुभदाराजे भोसले सावंतवाडी,दिव्यांजलीराजे निंबाळकर खर्डेकर,रेणुका देशमुख-शिंदे म्हैशाळकर, धनश्रीराजे आबाजीराजे भोसले तंजावर,इतिहासकार डॉ.उदय कुलकर्णी, निलेश करकरे,सत्यन वेलणकर,निलेश झोरे,नारायण विंचुरकर,समरजीत माहुरकर अशा विविध संस्थानिक घराण्यांचे प्रतिनिधी, इतिहासकार व अभ्यासक यांच्यावतीने दिले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!