नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे वचन

Spread the news

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी

­

 

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे वचन

  •  

नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात

नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील

नंदुरबार, दि. ३०:
नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी उभा आहे, असे वचन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले. नंदुरबार जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले.

नंदुरबार येथील सेंट मदर तेरेसा स्कूलमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हाध्यक्ष डाॅ. अभिजीत मोरे होते.

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी यासाठी आपण पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करू. महायुतीतील घटक पक्षावर अन्याय न करता राष्ट्रवादी पक्षाच्या विस्तार करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहुन काळजी घेईन. पक्ष संघटनासाठी सर्वांनी एकत्रित आणि एकदिलाने काम करा.

मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, स्वर्गीय अजितदादा पवार ज्या पुरोगामी विचारांवर उभी हयात वाटचाल करीत आले, तो पुरोगामी विचार आम्ही कधीही सोडणार नाही. सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढेल, यासाठी अथक प्रयत्न करू.

जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे म्हणाले, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आधुनिक व प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची गाठ श्रद्धा होती. त्यांच्या पुरोगामी विचारांवरील श्रद्धेतूनच नामदार हसरसाहेब मुश्रीफ यांनी महाराष्ट्राचा टोकाचा जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी समर्थपणे घेतली आहे.

हक्काच्या पाण्यासाठी आग्रही….!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, नर्मदा प्रकल्पांतर्गत अजूनही या विभागाच्या वाट्याचे हक्काचे दहा टी. एम. सी. पाणी उचललेले नाही. यापुढे ते दहा टी. एम. सी. पाणी या विभागाला देण्यासाठी व येथे हरितक्रांती फुलवण्यासाठी मी ऑटोकाट प्रयत्न करीन. शासन दरबारी त्याचा मनापासून पाठपुरावा करीन.

यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील नूतन नगराध्यक्ष, नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

यावेळी पक्षप्रवक्त्या प्रतिभा शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, माजी सभापती रतन पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, नवापूरचे नगराध्यक्ष जयवंत जाधव, तळोदाच्या नगराध्यक्षा सौ. भाग्यश्री चौधरी, नवापूरचे उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. सीमा सोनगिरे, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, मधुकर पाटील, नगरसेवक मोंटू जैन, मालतीताई वळवी, जेलसिंग पाडवी, योगेशभाऊ चौधरी, संगीताताई शिंपी, शितलताई पाडवी, जाकिरमिया जहांगीरदार, पप्पूभाऊ कुरेशी, अविनाश गावित यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविकपर भाषण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डाॅ. अभिजीत मोरे यांनी केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!