राजर्षी शाहू महाराजांना १०४व्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरात अभिवादन
समरजितसिंह घाटगे यांच्यासह मान्यवरांकडून आदरांजली
कोल्हापूर, प्रतिनिधी :
आरक्षणाचे जनक आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०४व्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर येथील नर्सरी बाग स्मारकस्थळी त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या जनक घराण्याचे वंशज तसेच शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
या प्रसंगी अखिलेशराजे घाटगे, यशराजे घाटगे, भाजप कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक विजय जाधव, नगरसेवक किरण नकाते, विजयसिंह खाडे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे, चंद्रकांत घाटगे, सहकार आघाडी अध्यक्ष सुधीर देसाई, डॉ. आनंद गुरव, डॉ. अजय चौगले तसेच कागलमधील नगरसेवक-नगरसेविका, शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले की, “राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी कोल्हापूर संस्थानात सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात केलेले कार्य आजही मार्गदर्शक आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन दिले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच राज्यघटनेत अनेक बाबींचा समावेश करण्यात आला. “शाहू महाराजांना अभिप्रेत असलेले लोककल्याणाचे कार्य करणे हीच खरी कृतिशील श्रद्धांजली आहे. आम्ही शाहू ग्रुपमधील त्यांच्या नावाने असलेल्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यासह सर्वच संस्थांच्या माध्यमातून शेतकरी, कर्मचारी व समाजातील विविध घटकांना त्यांना अभिप्रेत असलेले कार्य सहकारमहर्षि विक्रमसिंहराजे घाटगे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करीत आहोत.
फोटो ओळ:
कोल्हापूर येथील नर्सरी बाग स्मारकस्थळी राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजे समरजितसिंह घाटगे व मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन.




