वैज्ञानिक उपक्रमांव्दारे नारळीकर यांच्या स्मृतीची जपणूक व्हावी
डी.टी. शिर्के यांची अपेक्षा, विज्ञान कथा लेखन स्पर्धा बक्षिस वितरण
कोल्हापूर : कोल्हापुराचे सुपुत्र असलेले आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ डॅा. जयंत नारळीकर यांच्या स्मृती जपण्यासाठी वैज्ञानिक उपक्रमांची सातत्यपूर्ण आखणी आवश्यक आहे. त्यांच्या विज्ञान कथा लेखनाचा वसा अक्षर दालन आणि निर्धार या संस्थांनी पुढे नेण्यासाठी आयोजित केलेला हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे प्रशंसोदगार वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. डी. टी. शिर्के यांनी काढले.
ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या दोन्ही संस्थांनी आयोजित विज्ञान कथा लेखन स्पर्धा बक्षिस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. राजाराम महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख डॅा. रघुनाथ कडाकणे, अक्षर दालनचे रवींद्रनाथ जोशी, अमेय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॅा. शिर्के म्हणाले, खगोलशास्त्रामध्ये मोठी कामगिरी करणाऱ्या नारळीकर यांची मांडणी ही नेहमी निरीक्षण, तथ्ये, पुरावे याच्या आधारावरच राहिली. शिक्षितांची संख्या वाढत असली तरी वैज्ञानिक जाणीवा अजूनही विकसित करण्यासाठी तसे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. या स्पर्धतील विजेत्यांच्या कथांचा संग्रह प्रकाशित करण्यात यावा.
प्रा. डॅा. रघुनाथ कडाकणे म्हणाले, कला, साहित्य आणि विज्ञान या वेगवेगळ्या बाबी असल्या तरी लेखकांनी त्याच्या लेखनातून जी स्वप्ने पाहिली होती ती नंतरच्या काळात वैज्ञानिकांनी आपल्या संशोधनाच्या माध्यमातून सत्यात उतरवली आहेत. आता सर्वांना विज्ञानावर आधारित सुविधांचा उपभोग हवा आहे. मात्र वैज्ञानिक दृष्टी मात्र जोपासण्यात आपण कमी पडत आहोत.
यावेळी डॅा.सुनील विभुते बार्शी, दीपक कुंभार कोल्हापूर, डॅा. प्रशांत पुंडे कराड, डॅा. मोनाली हर्षे पुणे, डॅा. अविनाश भोंडवे पुणे, न्यानसी दावणे, प्रज्ञा जांभेकर मुंबई या कथा लेखन स्पर्धेतील विजेत्यांपैकी उपस्थितांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. समीर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला बाळ पाटणकर, प्रफुल्ल शिरगावकर, स्मिता शिरगावकर, डॅा. जी. पी.माळी, खंडकर यांच्यासह विज्ञानप्रेमी उपस्थित होते.
चौकट
नारळीकर यांच्या नावे सायन्स म्युजियम व्हावे
महाव्दार रोडवर नारळीकर यांचा वाडा होता एवढे सांगण्यापेक्षा आता त्यांच्या नावे कोल्हापूरमध्ये सायन्स म्युजियम व्हावे अशी अपेक्षा यावेळी डॅा. रघुनाथ कडाकणे यांनी व्यक्त केली.
फोटो कॅप्शन
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ डॅा. जयंत नारळीकर यांच्या प्रथम स्मृतीदिनी बुधवारी अक्षर दालन आणि निर्धार यांच्यावतीने आयोजित विज्ञान कथा लेखन स्पर्धेतील विजेत्यांना वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी राजाराम महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख डॅा. रघुनाथ कडाकणे, रवींद्रनाथ जोशी, समीर देशपांडे उपस्थित होते.





