श्री. महादेव सहकारी दूध व्यवसायिक संस्था मर्यादित, वडकशिवाले ता. आजरा यांचे संचालक श्री. प्रकाश तुकाराम बेलवाडे यांनी दिनांक एक जून, 2026 रोजी निवडणूक कार्यालय व सहकार खात्यातील सर्व अधिकाऱ्यांना अवमान याचिका दाखल करण्याची धमकी दिलेली आहे. सदर नोटीसमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने चालू केल्याचे आरोप केलेले आहेत. तसेच; महाराष्ट्र शासनाचे सर्वोच्च न्यायालय येथील वकिलांनी चुकीचा सल्ला देऊन त्या चुकीच्या सल्ल्याच्या आधारे चुकीची निवडणूक प्रक्रिया चालू करून मा. उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच- कोल्हापूर यांचे आदेशाचा अवमान केल्याचे आरोप करून निवडणूक प्रक्रिया तत्काळ थांबवावी, अशी मागणी केली आहे.
तथापि; मा. सर्वोच्च न्यायालय- दिल्ली यांचे आदेशाचा चुकीचा अर्थ काढून वीस दिवस निवडणूक प्रक्रिया लांबवण्याचा प्रयत्न केल्याने स्वामी समर्थ सहकारी दूध व्यावसायिक संस्था, मर्या. पुंगाव ता. राधानगरी यांच्यावतीने संबंधित अधिकारी यांचेवर फौजदारी अवमान याचिका दाखल केली जाणार आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशास अनुसरूनच महाराष्ट्र शासनाचे दिल्ली येथील वकिलांनी उचित व योग्य सल्ला दिल्यानंतरच गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेस खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने वकिलांचे सल्ल्याचा व मा. न्यायालयाचे आदेशांचा विपर्यास व चुकीचा अर्थ लावून न्यायालयीन व्यवस्थेचा अवमान करण्याचा प्रयत्न श्री. प्रकाश बेलवाडे व त्यांचे वकील ॲड. सतीश तळेकर यांनी केला आहे. त्यामुळे, त्यांचेवर देखील संस्थेमार्फत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाबद्दलची याचिका दाखल करण्यात येणार आहेत.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दिल्ली येथील मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील हे अंतिम असते. मा. सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध या देशामध्ये कोठेही अपील नाही. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मा. उच्च न्यायालयाचा आदेश खारीज म्हणजेच रद्द होतो. हे समजण्याएवढे श्री. प्रकाश बेलवाडे अज्ञानी असतील, असे आम्हाला वाटले नव्हते. तसेच; मा. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाच्या वकिलांकडून 90 दिवसांमध्ये निवडणूक पूर्ण करण्याचे वदवून घेऊन अपील निकालात काढले. तसेच; उपनिबंधक (दुग्ध)- पुणे हे ॲड. धर्माधिकारी यांना 90 दिवसांमध्ये निवडणूक पूर्ण करता येईल, असे ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगताना हे सर्वांनी पाहिले आहे.





