**महागाईविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मध्यवर्ती बस स्थानक येथे आंदोलन**
कोल्हापूर, दि. १ जून २०२६ : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अत्यंत कठीण झाले असून केंद्र व राज्य सरकारने महागाई नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज कोल्हापूर येथील मध्यवर्ती बस स्थानकासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पेट्रोल, डिझेल, गॅस, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किंमतींमुळे कामगार, शेतकरी, कष्टकरी, फेरीवाले आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी महागाईवर नियंत्रण आणावे, तसेच आवश्यक वस्तूंच्या किंमती कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड बनती सातपुते यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना सांगितले की, वाढती बेरोजगारी आणि महागाई यामुळे सामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कॉम्रेड बळवंत पवार यांनी जोशपूर्ण घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित कार्यकर्त्यांनी महागाईविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कॉम्रेड दिलदार मुजावर यांनी आभार मानले
या आंदोलनात कोल्हापूर शहरातील नागरिक, फेरीवाले, कामगार आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाद्वारे सरकारने महागाईवर नियंत्रण आणून जनतेला तातडीने दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणीया करण्यात आली.





