आपटे वाचन मंदिरतर्फे उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार जाहीर
जुई कुलकर्णी यांच्या काव्यसंग्रहास प्रतिष्ठेचा इंदिरा संत पुरस्कार
इचलकरंजी/प्रतिनिधी –
येथील शतकाेत्तर सुवर्णमहाेत्सवी आपटे वाचन मंदिर व इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात येणारे विविध उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे येथील कवयित्री जुई कुलकर्णी यांच्या ’तुझ्याकडे येण्याच्या कविता’ या काव्यसंग्रहाला प्रतिष्ठेचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे. तर पुण्याचे लेखक संताेष नागाे शिंदे यांच्या पटयारा प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या जिद्दीची विलक्षण कहाणी या पुस्तकाला उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दाेन्ही पुरस्कारांचे सन्मानपत्र व 10 हजार रुपये राेख असे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण समारंभ शनिवार 27 जून राेजी सायंकाळी 5 वाजता आपटे वाचन मंदिराच्या बजाज सभागृहात हाेणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
यावर्षीच्या लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कारांसाठी जितेंद्र कुवर (नाशिक) यांच्या झाडाची कविता आणि अरविंदा राजधर भामरे (धुळे) यांच्या शापित काेलाहलाच्या नाेंदी या काव्यसंग्रहांची निवड झाली आहे. तसेच लक्षणीय गद्य साहित्यकृती पुरस्कारासाठी रविंद्र बेडकिहाळ यांच्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर कर्तृत्वाचा एक शाेध (खंड 1 ते 3) आणि डाॅ. सिसिलिया कार्व्हलाे यांच्या प्रसादचिन्हे या साहित्यकृतींची निवड करण्यात आली आहे. याशिवाय क्षितिज देसाई यांच्या शीतपेटीतून जेव्हा जाग येते.. या कथासंग्रहास, अभय इनामदार यांच्या ’भूछत्र’ या कादंबरीस, पद्मजा मेहेंदळे यांनी अनुवादित केलेल्या ’सांजवेळेची’ या साहित्यकृतीस, डाॅ. नरेंद्र पाठक यांच्या वानाेळा या ललित गद्य साहित्यकृतीस, मालविका देखणे यांच्या मायरा आणि देवराईचे गुपित या बालसाहित्यकृतीस आणि नयन पन्हाड यांच्या जिवी जे गुंतले या साहित्यकृतीस विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत.
स्थानिक साहित्यिक पुरस्कारासाठी बापू तारदाळकर, तर साहित्यिक उत्कृष्ट वाचक पुरस्कारासाठी सुनील श्रेष्ठी यांची निवड करण्यात आली आहे. विविध साहित्य प्रकारांतील पुरस्कारांसाठी राज्यातील नामवंत साहित्यिकांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.





