आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली बैठकीत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी
शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षक, लेखाधिकारी बैठकीस उपस्थित
आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात आढावा बैठक पार पडली. कोल्हापूर मुख्याध्यापक संघात पार पडलेल्या या बैठकीस शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांच्यासह तिन्ही जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षक, लेखाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत प्रलंबित शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता प्रस्ताव, मेडिकल बिले, प्रमोशन फाईल, सेवानिवृत्त फाईल, अर्धवेळ शिक्षकांची मान्यता प्रस्ताव फाईली, रजा रोखीकरण यासारख्या प्रश्नांवर चर्चा होऊन ती मार्गी लावण्यात आली.
यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन व फरक बिले यांची स्थिती?, निवृत्तीवेतन व निवृत्ती लाभांच्या प्रकरणांचा निपटारा किती कालावधीत होणार?, अनुकंपा नियुक्तीची प्रकरणे प्रलंबित असल्यास त्याबाबत काय कार्यवाही झाली ?, शिक्षकांच्या पदोन्नती व वरिष्ठ वेतनश्रेणीच्या प्रस्तावांमध्ये होणारा विलंब कसा कमी केला जाणार?, रिक्त शिक्षक पदे भरण्याबाबत विभागाची भूमिका काय?, वेतन पथकाकडे प्रलंबित असलेल्या मंजुरी प्रस्तावांचा आढावा घेऊन त्यांचा निपटारा कधी होणार? अशा प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. बऱ्याच वेळा अधिकारी किरकोळ त्रुटी काढून शिक्षकांची कामे प्रलंबित ठेवतात. यासाठी एकदाच त्रुटी काढून ती कर्मचाऱ्यांना कळविण्यात यावी. आपल्या कार्यालयात कामासाठी येणाऱ्या प्रत्येक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. सर्व प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावावीत, यासाठी नियमित आढावा घेण्यात यावा, अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी आणि वेतन पथक या स्तरावरील अनेकांचे वैयक्तिक प्रश्न आमदार जयंत आसगावकर यांनी जागेवरच मार्गी लावले. जे प्रश्न शिक्षण संचालक, सचिव तसेच मंत्री महोदयांच्या स्तरावर प्रलंबित असतील त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. शेवटी आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते अनुकंप शालार्थ आयडीचे वाटप करण्यात आले.
या बैठकीस कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, शिक्षक संघटना, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



