*रेड अलर्ट असतानाही प्रतिबंधात्मक उपाययोजना का केल्या नाहीत*
*सतेज पाटील यांचा विधिमंडळात सवाल :*
*कोल्हापूर :* मुंबई-पुणे महामार्गावर दरवर्षी दरड कोसळते. हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला असतानाही सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना का केल्या नाहीत? असा सवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी विधिमंडळात उपस्थित केला.
आमदार पाटील म्हणाले, पहिल्याच पावसाने सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचे अपयश समोर आले. हे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. मुंबईत अपूर्ण झाडछाटणीमुळे झाडे कोसळून नागरिकांचा जीव जात आहे. टाळता येण्याजोग्या दुर्घटना का रोखल्या गेल्या नाहीत? सरकारने स्वत:च अपयश मान्य करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोरण जाहीर करावे अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. मानखुर्द येथील अनधिकृत इमारत दुर्घटनेतील दोषींवर कारवाई कधी होणार, असा सवालही त्यांनी केला.
मुंबईत दररोज १ कोटी ५ लाख नागरिक प्रवास करतात. मान्सूनची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.