अ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांचा ८ जुलै रोजी ग्रंथतुला करुन जाहीर सत्कार

Spread the news

प्रेस नोट

­

 

अ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांचा ८ जुलै रोजी ग्रंथतुला करुन जाहीर सत्कार
———-
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरचे सुपुत्र, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक अ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रंथतुला करून भव्य जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने हा सत्कार समारंभ बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती स्वागताध्यक्ष भरत रसाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमात सत्कारमूर्ती अ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांचा ग्रंथतुला करून सन्मान करण्यात येणार असून, हा उपक्रम ज्ञान, वाचनसंस्कृती आणि वैचारिक परंपरेचा गौरव करणारा ठरणार आहे. पुस्तकांच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या सामाजिक आणि बौद्धिक मूल्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ग्रंथतुलेचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम, साहित्यिक व चित्रपट निर्माते डॉ. रमेश विवेकी तसेच आंबेडकरवादी नेते उत्तमदादा कांबळे यांच्या हस्ते अ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शिक्षक नेते भरत रसाळे असून, मानवतावादी सांस्कृतिक चळवळीचे अनिल म्हमाने आणि डॉ. कपिल राजहंस हे निमंत्रक आहेत. तसेच सुरेश केसरकर, अ‍ॅड. शोभा चाळके, अ‍ॅड. करुणा विमल, विश्वास तरटे आणि अंतिमा कोल्हापूरकर यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी सत्कारमूर्तींचा सन्मान पुष्पगुच्छ किंवा शाल-श्रीफळाऐवजी वही, पेन आणि पुस्तक भेट देऊन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यायोगे ज्ञानदान, वाचनसंस्कृती आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ही संकल्पना समाजात सकारात्मक संदेश देणारी ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास कायदा, शिक्षण, सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिकांनी वेळेवरती मोठ्या संख्येने उपस्थित राहून अ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांना सदिच्छा द्याव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला भरत रसाळे, अनिल म्हमाने, सुरेश केसरकर, अ‍ॅड. करुणा विमल, मदन पवार, शंकर पुजारी, अंतिमा कोल्हापूरकर, सुनिल जाधव, अभिजीत मासुर्लीकर, गंगाधर म्हमाने उपस्थित होते.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!