*‘त्या’ ४१० दूध संस्थाबाबत सहानूभूतीपुर्वक विचार करा – महाडीक, नरके, जाधव , घाटगे यांनी केली प्रशासकांकडे मागणी*
कोल्हापूर : ‘गोकुळ’शी सलग्न ४१० दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याबाबत बजावलेल्या नोटीसामुळे संस्था पातळीवर अस्वस्थता पसरली आहे. संघाच्या पोटनियमानुसार संस्थांना नोटीसा पाठवल्या असल्या तरी कायद्याची अंमलबजावणी करत असताना त्याला व्यवहाराची सांगड घालून त्या संस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी ‘गोकुळ’च्या माजी संचालिका शौमिका महाडीक, माजी संचालक डॉ. चेतन नरके व अंबरीष घाटगे यांनी प्रशासकांकडे केली.
राज्य शासनाच्या व्दिसदस्यीय समितीच्या अहवालानुसार विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे यांनी संबधित ४१० दूध संस्थांचे सभासद रद्द करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. या संस्थांनी कोल्हापूर सर्कीट बेंचमध्ये अपील केली असताना न्यायालयाने ‘गोकुळ’च्या प्रशासनाने नैसर्गिक न्याय तत्वानुसार निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले. त्यानुसार संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी त्या ४१० दूध संस्थांना सभासदत्व रद्द का करु नये? अशा आशयाच्या नोटीसा बजावल्या आहेत. या संस्थांनी शौमिका महाडीक यांच्यासह भाजपच्या संचालकांची भेट घेतली. या संस्था प्रतिनिधींसह महाडीक, डॉ. चेतन नरके व अंबरीष घाटगे यांनी सोमवारी ‘गोकुळ’च्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य बलकवडे यांची भेट घेतली.
यावेळी, शाैमिका महाडीक म्हणाल्या, जिल्ह्यातील सर्वच दूध संस्था आमच्या आहेत. त्यांच्या बळावरच आज ‘गोकुळ’ उभारला आहे, याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. त्यासोबतच कोणतीही सहकारी संस्था ही पोटनियमानुसार चालते, हेही आम्ही जाणतो. दुर्दैवाने मागच्या काळामध्ये जिल्ह्यातील काही नेत्यांनी या पोटनियमांची पायमल्ली करून काही संस्थांना सभासदत्व दिले. आज तेच नेते या मुद्द्याचं राजकारण करू पाहत आहेत. वास्तविक पाहता संस्थांची यामध्ये काही चूक नाही. पण पोटनियम डावलल्यामुळे रीतसर त्यांच्यावर कारवाई होत आहे. त्यामुळे अश्या संस्थांशी व्यवहार बंद न करता त्यांना दुय्यम किंवा ब वर्ग सभासद म्हणून कायम ठेवता येईल का ? आणि भविष्यात त्यांच्याकडून पोटनियमांचे पालन आणि अटींची पूर्तता करून पुन्हा सभासद होण्याची संधी देता येईल का ? याचा सहानुभीतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा, म्हणून आम्ही आज प्रशासकांची भेट घेतली.”
संबंधीत मागण्यांचे निवेदन प्रशासकीय मंडळाचे सदस्य बलकवडे यांना देण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील,गोकुळचे माजी संचालक चेतन नरके,गोकुळचे माजी संचालक विश्वास जाधव,प्रमोद पाटील व संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
*महायुती एकसंघ ; दुय्यम फळीतील नेते काय बोलतात यापेक्षा नेते काय म्हणतात हे महत्वाचं.*
2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना महाडिक म्हणाल्या,”काही लोक महायुतीत नवे आहेत, उत्साही आहेत. नेत्यांना खुश करण्यासाठी काहीतरी बोलून जातात. त्यामुळे ते काय म्हणतात यापेक्षा नेते काय म्हणतात हे महत्वाचं आहे. मुश्रीफ साहेब आणि आम्ही महायुतीचा सन्मान करतो. त्यामुळे महायुती म्हणून आम्ही एकसंघपणेच भविष्यातील वाटचाल करू.




