शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात शिवरायांवरील २ क्रेडिटचा अभ्यासक्रम अनिवार्य व मोफत: कुलगुरूंची घोषणा

Spread the news

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात
शिवरायांवरील २ क्रेडिटचा अभ्यासक्रम अनिवार्य व मोफत: कुलगुरूंची घोषणा

कोल्हापूर, दि. ६ जून: शिवाजी विद्यापीठात आज शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला. शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील २ क्रेडिटचा ऑनलाईन अभ्यासक्रम अनिवार्य व मोफत करणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी या निमित्ताने केली.

सकाळपासूनच विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे पोवाडे घुमत होते. कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास तसेच त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठ परिसरातून डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकासह ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवगर्जनांच्या जयघोषात भव्य ‘शिवज्योत रॅली’ काढण्यात आली. रॅलीमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला.

कार्यक्रमात वेंगरूळ (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील सव्यसाचि गुरुकुलमच्या कलाकारांनी पारंपरिक मर्दानी खेळांची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक आणि लाठीकाठी यांसारख्या युद्धकौशल्यांचे सादरीकरण पाहून उपस्थितांनी दाद दिली.

  •  

यानंतर राजर्षी शाहू सभागृहात विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनी कीर्ती आंबेडकर हिने सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांना शिवकालीन पराक्रमाची अनुभूती दिली. वैष्णवी पोतदार हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि स्वराज्य संकल्पनेवर प्रभावी भाषण केले. तसेच, मर्दानी खेळांची झलक आणि शिवराज्याभिषेकावर आधारित नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमावर कळस चढविला.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांचा प्रेरणादायी वारसा अनुभवता आला. या कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, मानव्यविज्ञान विद्याशाखाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. कबीर खराडे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिविभाग प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुरेखा आडके, विजय इंगवले यांच्यासह विद्यार्थी विकास विभागातील सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले. डॉ. प्रमोद पाटील यांनी आभार मानले.

दरम्यान, रायगड येथे आज मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या प्रमुख कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे पथक रायगडावर दाखल झाले आहे. कार्यक्रमात सहभागाबरोबरच कार्यक्रमानंतर गडावर स्वच्छता मोहीम राबवून हे पथक माघारी परतणार आहे.

“विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांसाठी शिवरायांचा २ क्रेडिटचा अभ्यासक्रम मोफत व अनिवार्य”

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत भारतीय ज्ञान प्रणालीला अनुसरून शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्य, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि स्वराज्य संकल्पनेवर आधारित दोन क्रेडिटचा ऑनलाईन अभ्यासक्रम अनिवार्य आणि मोफत करीत असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमात केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य हे भारतीय ज्ञान प्रणालीचे प्रभावी आदर्श असून, त्यांच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना नेतृत्व, न्याय, प्रशासन आणि राष्ट्रनिर्मितीचे मूल्य शिकता येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!