मंदिर परिसर विकासात बाधित होणाऱ्यांचे याच परिसरात पुनर्वसन करा

Spread the news

मंदिर परिसर विकासात बाधित होणाऱ्यांचे याच परिसरात पुनर्वसन करा

­

 

को.दि. २३ : प्रस्तावित श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसर विकास आराखड्यामध्ये बाधित होणाऱ्या स्थानिकांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाने कोणताच विचार केलेला नाही. सर्व व्यावसायिक आणि रहिवासी यांचे याच परिसरात पुनर्वसन करावे. ते न झाल्यास आणि आमचे अमूल उच्चाटन करण्याचा प्रयत्न झाल्यास नाईलाजाने आम्हाला तीव्र जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा आज मंदिर परिसर विकास आराखड्यात बाधित होणाऱ्या व्यावसायिक आणि रहिवाश्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राठोड यांना दिला.

  •  

कोल्हापुरातील जगप्रसिध्द श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसराचा विकास करण्याचा विषय सन २००८ सालापासून सुरू आहे. यामध्ये प्रत्येकवेळी प्रशासानाकडून अव्यवहार्य आणि विनाकारण मोठे भूसंपादन करण्याचे प्रस्ताव येत गेल्यामुळे त्याला सातत्याने विरोध होत गेला. गेल्या २/३ वर्षात तत्कालीन जिल्हाधिकारी अणि देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी याविषयास अग्रक्रम देउन पुन्हा एकदा नविन आराखडा शासनास सादर केला आहे. याबाबत त्यांचेशी अनेकवेळा भेटीगाठी होऊन आणि निवेदने दिल्यानंतरही दुर्दैवाने स्थानिक रहिवासी आणि व्यावसायीक यांच्या पुनर्वसनाचा पुरेसा विचार या नविन प्रस्तावात केलेला नाही.

या परिसरात रहिवासी जागामालक, भाडेकरू, दुकानदार आणि फेरीवाले यांचेसह सुमारे ५५० युनिट्स आहेत. यामध्ये मालक, नोकर, अवलंबीत अशी सुमारे ३००० कुटुंबे बाधीत होणार आहेत. सद्यस्थितीत शासनाच्या विचाराधीन असलेल्या प्रस्तावात यांच्या पुनर्वसनाचा विचार केलेला नाही असे दिसते. या ठिकाणी असणारे बहुतांश व्यावसायीक व रहिवासी या परिसरात पिढ्या‌न्पिढ्या स्थायीक आहेत. व्यावसायीकांच्या ४/४ पिढ्या श्री अंबामातेच्या सान्निध्यात आणि तिच्या आशिर्वादाने आपाला उदरनिर्वाह चालवत आहेत. रहिवाश्यांच्या कित्तेक पिढ्या या ठिकाणी वाढल्या. बहुतेक व्यवसाय हे मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या खरेदीवर ६०% अवलंबून आहेत. या ठिकाणाहून व्यवसाय इतरत्र हलविल्यास त्याचा व्यवसायंवर विपरीत परिणाम होऊन या सर्वांचा उदरनिर्वाह बंद पडण्याची रास्त भिती आहे.
. त्यामुळे या ठिकाणाहून अन्यत्र कोठे स्थलांतरीत होणे दुरापास्त आहे.

या प्रकल्पासाठी काही मिळकतधारकांनी आपल्या मिळकती शासनाला देण्यास मान्यता दिली होती, परंतु त्यापैकी एका इमारतीवर मोबदल्याचा प्रशासकीय प्रस्ताव तयार झाल्यानंतर, मिळणारा मोबदला हा सध्याच्या तेथील बाजारभावाच्या मानाने अत्यल्प असेल असे स्पष्ट झाले. एका बाजूला या ठिकाणाहून आम्हाला बाजूला केल्यास व्यवसाय बंद होण्याची भिती आणि दुसऱ्या बाजुला अत्यल्प मोबदला असे चित्र दिसू लागल्यामुळे अनेकांना प्रकृती अस्वास्थ्य जडले आहे.

बाधित होणाऱ्या सर्वांचे याच परिसरात पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यासाठी कपिलतीर्थ मार्केट चा याच परिसरासोबत विकास केला तर येथे राहू इच्छिणाऱ्या बहुतांश व्यावसायिक आणि रहिवाशांचा प्रश्न समाधानकारकरित्या सुटू शकेल. या परिसरातच कोल्हापूर चे गामदैवत श्री भीमाशंकर कपिलेश्वराचे मंदिर आहे. मंदिर विकासास हा परिसर जोडल्यास श्री महालक्ष्मी, श्री ज्योतिबा, श्री तुळजाभवानी, श्री रंकभैरव, श्री गणेश आणि श्री कपिलेश्वर असे धार्मिक सर्किट तयार होऊ शकेल.

हे सर्व विषय वेळोवेळी प्रशासन आणि लोकप्रतिनीधी यांचेकडे लेखी पोहोचविले आहेत. परंतु पूर्वीचे जिल्हाधिकारी यांनी याचा कोणताही विचार न करता घाईगडबडीने अत्यंत अव्यवहार्य आणि शासनावर विनाकारण खर्चाचा बोजा वाढविणारा प्रस्ताव तयार करून घेतला आहे. या परिसरातील सर्व व्यवसायीक आणि रहिवासी यांना या ठिकाणाहून बाहेर काढल्याससर्व व्यावसायिक, त्यांची कुटुंबे तसेच अवलंबीत असलेल्या सर्वांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकेल हे आणि आम्हा सर्वांचे याच परिसरात पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित आराखड्यात आवश्यक ते बदल करावेत अशी आमची आपल्याला हात जोडून विनंती आहे. तसे न झाल्यास आणि या परिसरातून आमचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्हाला नाइलाजाने त्याच्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभा करावे लागेल असा इशारा शिष्टमंडळाने दिला. शिष्टमंडळात जयंत गोयानी, अभिजित भोसले, अर्जुन नलावडे, रविराज पोवार, राजेश कनानी, माणिक सुगंधी, रोहन दातार, प्रशांत साळवी, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते, नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील आदिंचा सहभाग होता


Spread the news

You may also like

error: Content is protected !!