Spread the news

उत्थान – ICAI MSME महोत्सव २०२६ उत्साहात संपन्न

­

 

कोल्हापूर शाखा, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC) अंतर्गत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) यांच्या वतीने आयोजित ‘उत्थान – ICAI MSME महोत्सव २०२६’ गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी द पॅव्हेलियन हॉटेल, कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

  •  

यावेळी कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सी.ए. अशिष सेवेकरी, उपाध्यक्ष सी.ए. आलोक शहा, सचिव सी.ए. राघवेंद्र बकरे, खजिनदार सी.ए. निखिल देवणे, माजी अध्यक्ष सी.ए. नितीन हरगुडे तसेच विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षा सी.ए. प्रीती पाचोरे उपस्थित होत्या. त्याचबरोबर कोल्हापूर परिसरातील विविध उद्योग, व्यापार व व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, चार्टर्ड अकाउंटंट्स, बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘मेड इन इंडिया’ या उपक्रमांच्या माध्यमातून एमएसएमई क्षेत्रासाठी उपलब्ध होत असलेल्या संधींचा आढावा घेतला. उद्योगांनी नावीन्य, गुणवत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे, तसेच आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत एमएसएमई क्षेत्राने महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) भेडसावणाऱ्या विविध समस्या, शासनाच्या योजना, उद्योगवाढीच्या संधी, वित्तपुरवठा, डिजिटल परिवर्तन आणि व्यवसाय विकास याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हे होते. या निमित्ताने उद्योजकांना उद्योगवाढीसाठी आवश्यक असलेले व्यावहारिक ज्ञान, नवीन संधी आणि शासकीय योजनांची माहिती एका व्यासपीठावर मिळाली.

महोत्सवात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी एमएसएमई उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त अशा विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. सी.ए. चंदन लाहोटी यांनी एमएसएमईसाठी उपलब्ध विविध संधी या विषयावर उद्योगवाढीच्या नव्या संधी स्पष्ट केल्या. सी.ए. नितीन हरगुडे यांनी एमएसएमई उद्योगांना कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. सिद्धार्थ पंडित यांनी ब्रँडिंग व व्यवसायाचा प्रभावी प्रचार कसा करावा याविषयी आधुनिक मार्केटिंग तंत्रांची माहिती दिली. ॲड. धनेश राळे यांनी एमएसएमईसमोरील व्यावहारिक समस्या व त्यांवर मात करण्याचे उपाय या विषयावर कामगार कायदे, मानवी संसाधन, पर्यावरणविषयक अनुपालन तसेच स्थानिक प्राधिकरणांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे सखोल विवेचन केले. तसेच सी.ए. यतीराज मर्दा यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रोत्साहनपर योजना, अनुदाने व सवलतींचा उद्योगांना कसा लाभ घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक सत्रानंतर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उद्योजकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी एमएसएमई क्षेत्र हे देशाच्या आर्थिक विकासाचा कणा असून उद्योगांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी चार्टर्ड अकाउंटंट्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. उद्योग, शासन आणि व्यावसायिक यांच्यातील समन्वय वाढवून अशा ज्ञानवर्धक उपक्रमांमुळे उद्योजकांना योग्य दिशा, आवश्यक मार्गदर्शन आणि नवीन संधी उपलब्ध होऊन उद्योगवृद्धीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना व महोत्सवाची माहिती शाखा अधिकारी स्वप्निल सादळे यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोल्हापूर शाखेच्या व्यवस्थापन समितीने सर्व प्रमुख पाहुणे, तज्ज्ञ वक्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, सहभागी उद्योजक, प्रायोजक तसेच उपस्थितांचे आभार मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!