‘शेतकरी व साखर कारखानदारी बचाव आंदोलन’ची कोल्हापुरात स्थापना – माणिक पाटील (चुयेकर) यांचा पुढाकार
कोल्हापूर दि.०४ : केंद्र सरकारच्या साखर उद्योगांना सद्याच्या मारक अशा धोरणामुळे देशाबरोबरच महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आणि तमाम शेतकरी वर्ग अतिशय अडचणीत आला आहे. याला संघटितपणे लढा देण्यासाठी पदवीधर मित्र संघटनेच्या वतीने माणिक पाटील (चुयेकर) यांनी पुढाकार घेतला असून, कोल्हापुरात ‘शेतकरी व साखर कारखानदारी बचाव आंदोलन’ची स्थापना करण्यात आली आहे. या बचाव आंदोलनाच्या स्थापनेबाबत जिल्हा व परिसरातील सर्वच शेतकरी संघटना व साखर कारखानदारांचे चेअरमन व संचालक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असून, याला सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एफआरपी रू.४५००/- व एमएसपी मध्ये रू.२०/- ची वाढ या महत्त्वाच्या मागण्यांसह साखर उद्योगातील अन्य मागण्याबाबत माणिक पाटील यांनी अलिकडेच केलेल्या अन्नत्याग आंदोलनातून या सर्वांना प्रथमच एकत्रित आणले आहे. या मागण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या बचाव आंदोलनाचे पहिले अधिवेशन लवकरच कोल्हापुरात होत असल्याचे माणिक पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे म्हटले आहे.




