*एमईआरसीच्या वीजदर प्रश्नावर मुख्यमंत्री बैठक घेणार*
*सतेज पाटील यांनी उपस्थित केला होता प्रश्न*
*कोल्हापूर :* एमईआरसीने केलेली वीज दरवाढ आणि ग्राहकांवर लावल्या गेलेल्या टीओडी आणि ग्रीड चार्जेस अन्यायकारी आहे. त्यामुळे या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी विधिमंडळात केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या घटकांवर अन्याय झाल्याची भावना आहे त्या सर्वांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन दिले.
आमदार पाटील म्हणाले, राज्यातील औद्योगिक आणि आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज विक्री करांमध्ये वाढ केली आहे. राज्य शासन दरवाढ न होण्याचा कितीही सांगत असले तरी तशी वस्तुस्थिती नाही. इतर राज्याच्या मानाने महाराष्ट्राचे वीजदर जास्त आहे. त्यातच एमईआरसीने केलेली वीज दरवाढ आणि ग्राहकांवर लावल्या गेलेल्या टीओडी आणि ग्रीड चार्जेस अन्यायकारी आहे. पी.एम. कुसुम योजनेमध्ये ग्रीड चार्जेस ५ हजार युनिटवर गेल्यावर लावले जात आहेत. ती २० हजार करावी. शेतकऱ्यांची क्रॉस सबसिडी थांबवू नये. सरकारने फिडरवर मीटर लावावेत, त्यामुळे किती वीज जाते हे कळेल. फोर्स भारनियमन बंद करावे. येत्या १४ जुलैला या संदर्भात सुनावणी आहे. त्यापुर्वी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी आणि ग्राहकांना न्याय द्यावा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या घटकांवर अन्याय झाल्याची भावना आहे त्या सर्वांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी लवकरच बैठक घेऊ असे आश्वासित केले.
*चौकट :* इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीजदर जास्त
सरकार वीजदर कमी केल्याचे सांगते मात्र, वीजआकार वाढल्याचे दिसते. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीजदर कमी असल्याचे सांगितले गेले मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. उलट इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीजदर जास्त असल्याचे आमदार पाटील यांनी निर्दशनास आणून दिले. विजबिलात जे अतिरिक्त चार्जेस देशात कुठेही लावले जात नाहीत ते आपल्याकडे लावले जात असल्याचा दावाही आमदार पाटील यांनी केला.




