प्राची चरापले (गौरकर) यांची सिंगापूरमध्ये इको लॅब कंपनीच्या संचालकपदी निवड.
कौलवच्या कन्येच्या यशाने परिसराचा गौरव.
जिद्द, अथक परिश्रम, सातत्याने ज्ञानार्जन आणि प्रभावी नेतृत्व यांच्या बळावर जागतिक औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या प्राची अभिजित चरापले (गौरकर) कौलव (ता राधानगरी) यांची सिंगापूर येथील इकोलॅब या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये संचालक पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्राची यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण कॉन्व्हेंट शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी रायगड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी संपादन केली. पुढे त्यांनी विपणन व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. नोकरी सांभाळत असतानाच महिला सक्षमीकरण विषयातील पदव्युत्तर पदविकाही पूर्ण केली.
व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात त्यांनी तांत्रिक अभियंता म्हणून केली. त्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक प्रकल्पांचे यशस्वी नेतृत्व केले. अल्पवयातच कर्मचारी व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळून त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांची छाप पाडली.
त्यानंतर भारत, मध्यपूर्व आणि आफ्रिका या प्रदेशांतील व्यवसायवृद्धीचे नियोजन व नेतृत्व त्यांनी यशस्वीपणे केले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना अनेक मानाचे संस्थात्मक पुरस्कार प्राप्त झाले.
याशिवाय भारतातील विविधता आणि सर्वसमावेशकता उपक्रमाचे नेतृत्व करताना त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित व्यावसायिक प्रवासासंदर्भातील धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले.
आता त्यांच्या कारकिर्दीतील पुढील महत्त्वाच्या टप्प्यात त्या सिंगापूर येथून आशिया-पॅसिफिक विभागातील नऊ देशांच्या व्यवसायवृद्धीची जबाबदारी संचालक म्हणून सांभाळणार आहेत.
सतत शिकण्याची वृत्ती, दूरदृष्टी, प्रभावी नेतृत्व, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि समाजासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याची तळमळ हीच प्राची अभिजित चरापले (गौरकर) यांची खरी ओळख आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे कौलवसह संपूर्ण परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, तरुण पिढीसाठी त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.




