- ‘केआयटी’ च्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांची एकजूट
दिल्लीत ‘अल्युमिनी मीट २०२६’ चा दैदीप्यमान सोहळा संपन्न
नवी दिल्ली: वारशाचा सन्मान आणि नात्यांची पुनर्भेट यांचा अनोखा संगम म्हणजेच कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (केआयटी) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटने (किटा ) आयोजित केलेला ‘अल्युमिनी मीट २०२६’ हा भव्य सोहळा ९ मे २०२६ रोजी नवी दिल्लीतील क्राउन प्लाझा, ओखला येथे उत्साह, अभिमान आणि आपुलकीच्या वातावरणात दिमाखात संपन्न झाला.
प्रामुख्याने मध्य व उत्तर भारतातील तसेच अन्य देशातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या शेकडो माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.नोंदणी प्रक्रियेनंतर प्रा. जाहिदा खान यांच्या स्वागतपर प्रास्ताविकाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन झाले. केआयटी चे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी संस्थेच्या ४३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आलेख प्रभावी सादरीकरणातून उलगडून दाखवला. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, उद्योगसहकार्य आणि माजी विद्यार्थ्यांचे योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला. संस्थेची सातत्यपूर्ण प्रगती आणि भक्कम उभारणी पाहून उपस्थित माजी विद्यार्थी भारावून गेले आणि टाळ्यांच्या गजरात त्यांनी संस्थेचे व व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.
केआयटी व किटा चे अध्यक्ष श्री. साजिद हुदली या प्रसंगी म्हणाले, “ दरवर्षी भारतात वा परदेशात तेथील चॅप्टर च्या माध्यमातून माजी विद्यार्थी संघाचा मेळावा होत असतो.त्यामुळे अधिकाधिक देश विदेशातील माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पोर्टलवर नोंदणी करून मातृ संस्थेच्या शाश्वत विकासात व केआयटी ला जागतिक ब्रँड करण्यात आपले योगदान द्यावे.” तसेच दर महिन्याला होणाऱ्या ‘किटा कनेक्ट’ या ऑनलाइन संवादातून आपली वा आपल्या व्यवसायाची यशोगाथा आणि अनुभव सध्याच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना केले.
केआयटी चे विश्वस्त व माजी विद्यार्थी संघाचे (किटा) उपाध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. दिल्ली चॅप्टर प्रमुख श्री. आयुष देव कौशिक, पुणे चॅप्टर प्रमुख श्री. प्रकाश सोमय्या आणि कोल्हापूर चॅप्टर सदस्य श्री. पुनीत गांधी यांनी आपल्या हृदयस्पर्शी आठवणींनी कार्यक्रमात भावनिक रंग भरले. ‘उजाळा’ या विशेष सत्रात माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील गोड आठवणी, मजेदार किस्से आणि अनुभव शेअर केले. अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांच्या गप्पा-गोष्टींनी सभागृहात आनंद आणि आपुलकीचा ओलावा निर्माण झाला.
या संपूर्ण आयोजनासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सचिन मेनन, सचिव श्री. दीपक चौगुले आणि इतर विश्वस्तांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी अधिष्ठाता – माजी विद्यार्थी डॉ. सुनील कारिदकर यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.या मेळाव्यामुळे माजी विद्यार्थ्यांमधील बंध अधिक दृढ झाले असून, संस्थेशी असले नाते अधिक घट्ट झाले आहे, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
फोटो तपशील :-
१) केआयटी कॉलेजच्या दिल्ली येथे संपन्न झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री.साजिद हुदली.सोबत डावीकडून प्रा.सुनील कारिदकर, डॉ.मोहन वनरोट्टी,श्री.सुनील कुलकर्णी, आयुष देव कौशिक व पुनीत गांधी.
२) केआयटी कॉलेजच्या दिल्ली येथे संपन्न झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री.साजिद हुदली.सोबत डावीकडून प्रा.सुनील कारिदकर, डॉ.मोहन वनरोट्टी,श्री.सुनील कुलकर्णी, आयुष देव कौशिक ,पुनीत गांधी व अन्य सहभागी माजी विद्यार्थी




