Spread the news

प्रेस नोट

­

 

डॉ. भारत पाटणकर व प्रा. किसनराव कुराडे यांना ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार-2026’ जाहीर
2 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात होणार पुरस्कार वितरण
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने प्रदान करण्यात येणारा मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार-2026’ यावर्षी ज्येष्ठ दिशादर्शक विचारवंत डॉ. भारत पाटणकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. ही माहिती मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पुरस्कारांचे वितरण रविवार, दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित पहिल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
यावेळी भरत रसाळे, शाहीर दिलीप सावंत, उत्तमदादा कांबळे, डॉ. डी. वाय. जमादार, डॉ. कपिल राजहंस, डॉ. शोभा चाळके, मदन पवार, अनिल म्हमाने, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. वसंत भागवत, अ‍ॅड. करुणा विमल, सुरेश केसरकर, डॉ. वैशाली चौगुले, राहुल सडोलीकर, विद्याधर कांबळे, डॉ. अमोल महापुरे, संजयकुमार अर्दाळकर, प्रा. दादासाहेब ढेरे, गंगाधर म्हमाने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
डॉ. भारत पाटणकर यांनी गेली चार ते साडेचार दशके श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी जनसमुदायाच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील लढाऊ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून ‘मुद्दा आहे जग बदलण्याचा?’ यासह पन्नासहून अधिक ग्रंथांचे त्यांनी लेखन केले आहे. विचारवंत, लेखक आणि समाजप्रबोधनकार म्हणून त्यांनी राज्याच्या सामाजिक जीवनावर महत्त्वपूर्ण ठसा उमटविला आहे.
प्रा. किसनराव कुराडे यांनी समाजशास्त्राचे सुमारे वीस वर्षे अध्यापन केले असून ते शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि सीतायणकार म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले असून सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. तीसहून अधिक ग्रंथांचे त्यांनीही लेखन केले आहे. पुरोगामी लेखक व साहित्यिक म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
या दोन्ही मान्यवरांच्या दीर्घकालीन सामाजिक, वैचारिक आणि साहित्यिक योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार-2026’ जाहीर करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला भरत रसाळे, अनिल म्हमाने, सुरेश केसरकर, अ‍ॅड. करुणा विमल, मदन पवार, शंकर पुजारी, अंतिमा कोल्हापूरकर, सुनील जाधव, अभिजित मासुर्लीकर, गंगाधर म्हमाने आणि अर्हंत मिणचेकर उपस्थित होते.

  •  

मा. संपादक/पत्रकार साहेब

विनंती
1. सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक/चॅनल/वेब पोर्टलवर प्रसिद्धी करावी ही विनंती.
—————–
09822472109


Spread the news

You may also like

error: Content is protected !!