*कागलमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा अनावरण कार्यक्रम ‘न भूतो न भविष्यति’ करूया…. !*
*मंत्री हसन मुश्रीफ व राजे समरजितसिंह घाटगे यांचे आवाहन*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नऊ ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात*
कागल, दि. २:
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे जनतेचे राजे होते. त्यांचे संस्थान आणि राज्यही जनतेचेच होते. त्यांच्या कार्याने त्यांनी कागलसह कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशातच नव्हे तर संबंध जगात अजरामर केले. अशा या महान ऋषितुल्य राजांचा कागलमधील पुतळा अनावरणाचा कार्यक्रम ‘न भूतो न भविष्यति’ करूया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनीच मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ व माजी युती घडवून आणली. ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने कागलमध्ये येत आहेत. कागल तालुक्याच्या विकासासाठीच ही युती झाल्याचे त्यांना दाखवून देऊया.
कागल नगरपरिषदेच्यावतीने बॅरिस्टर खर्डेकर चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना केली आहे. या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री नामदार श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे. तसेच; यावेळी कागल शहरातील सव्वाशेवर्षाहून अधिक जुनी ऐतिहासिक शाळा श्रीमंत हिंदुराव घाटगे विद्यामंदिरच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचा लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळावाही होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कागल शहरासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची नियोजनाची बैठक झाली.
भाषणात बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कागल शहरात छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, श्री. बसवेश्वर महाराज यांसह महान व्यक्तींचे पुतळे याआधी उभारले आहेत. परंतु; राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा नसल्याची खंत मनात सतत लागून राहिली होती. या पुतळ्याच्या निमित्ताने समस्त कागलवासियांची ही इच्छा पूर्ण होत आहे.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समतेचा विचार संपूर्ण देशासह जगाला दिला. राज्य कसे करावे, सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन कसे जावे, संस्थानाचा खजिना जनतेसाठी कसा खुला करावा, यासह प्राथमिक शिक्षण मोफत, जनतेसाठी आरक्षण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिले. त्यांना अजूनही जादा आयुष्य मिळाले असते तर मानवकल्याणाच्या अनेक गोष्टी त्यांनी करून दाखविल्या असत्या.
शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कागलमध्ये झालेली युती किती सार्थ आहे, हे मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाखवून देऊया. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या कर्जमाफीसह वीज बिलमाफीच्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी यानिमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्याच्या रूपाने मिळालेली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या भव्य- दिव्य पद्धतीने पार पडण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. यासाठी कागल शहरासह गावोगावी कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन करावे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारांने झालेल्या कागलमधील युतीनंतर हा पहिलाच कार्यक्रम होत आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न असल्याने त्यास साजेसा सोहळा साजरा करूया.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने म्हणाले, कागल ही ऐतिहासिक नगरी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. त्यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम हा दिखावा नसून या कार्यक्रमाचे भावनिक मूल्य फार मोठे आहे. कागल शहरासह तालुक्यासाठी हा भविष्यवेधी ठरणारा कार्यक्रम आहे, असेही ते म्हणाले.
*त्याची मला जाणीव आहे…..!*
श्री घाटगे म्हणाले, येत्या फेब्रुवारी महिन्यात श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. मुख्यमंत्री त्या कार्यक्रमासाठी कागलमध्ये येणार आहेत. दरम्यान; मंत्री श्री. मुश्रीफ हे श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक आहेत, याची मला जाणीव आहे. त्या कार्यक्रमासाठी श्री. मुश्रीफही प्रमुख उपस्थित म्हणून असतील.
यावेळी व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, युवराज पाटील, नगराध्यक्षा सौ. सविता प्रताप उर्फ भैया माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, जेष्ठ नेते चंद्रकांत गवळी, विकास पाटील, शशिकांत खोत, सत्यजित पाटील-सोनाळीकर, मुख्याधिकारी अजय पाटणकर, नगरसेविका सौ. मेघा माने, नगरसेविका श्रीमती रंजना सणगर, नगसेविका सौ. सारिका बारड, नगरसेवक प्रकाश गाडेकर, संजय चितारी, दिनकर कोतेकर, डि. एम. चौगुले, बळवंत माने, मारुती मदारे, सुनिल गाडेकर, सुनीलराज सुर्यवंशी, युवराज पसारे, सुशांत कालेकर,अरुण गुरव, रणजित पाटील, बाळू माळी, बाळू हेगडे,शआप्पासो हुच्चे, रवि पाटील, रंगराव पाटील, आनंदा पसारे, रणजित सुर्यवंशी, ॲड. जिवनराव शिंदे, दिपक मगर , सुभाष चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी केले. प्रास्ताविक नगराध्यक्ष सौ. सविता प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले. सूत्रसंचालन विजय काळे यांनी केले. आभार नगरसेवक दीपक मगर यांनी मानले.
…………….
*कागल – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्या नियोजनाच्या बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शाहू समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे.*
==========




