सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील यांचा सत्कार
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती
मडिलगे हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, मडिलगे बुद्रुक या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील मंगळवारी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते डॉ. पाटील सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन, मा. आमदार के. पी. पाटील होते.
पाटील सरांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देऊन मंत्री आबिटकर म्हणाले, पाटील सरांकडे काम करण्याची प्रचंड ऊर्जा आहे. काम करण्याची चिकाटी आणि प्रशासनातील शिस्त या जोरावरच आज पाटील सरांचे विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत. एक प्रयोगशील शिक्षक म्हणून पाटील सरांची भुदरगड तालुक्यात ओळख निर्माण झालेली आहे. पाटील सरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन करत कोल्हापूर जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल, यावर नक्की भर दिला जाईल. आमदार जयंत आसगावकर म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन जाणारी बहुआयामी व्यक्तिमत्व अशी पाटील सरांची ओळख आहे. गणित विषय सोप्या पद्धतीने शिकवण्यात पाटील सरांचा हातखंडा आहे. मुख्याध्यापक संघात काम करताना त्यांनी विविध समित्यांवर उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा व कार्याचा शाळेला व समाजाला नक्की फायदा होणार आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासंबंधी पालकमंत्र्यांनी शिक्षणमंत्री भुसे साहेब यांच्याशी चर्चा करून त्यातून सकारात्मक मार्ग काढावा. तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामातून कार्यमुक्त करावे. जुनी पेन्शन प्रश्नामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांनी केली.
यावेळी मा. आमदार बजरंगआण्णा देसाई, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती सारिका नांदेकर, भुदरगड शिक्षण संस्थेचे सचिव गणेश मुंगळे, भुदरगड शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष बी. एस. माने, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पोवार, उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, सचिव आर. वाय. पाटील, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, भुदरगड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील, दादा लाड, के. ए. देसाई, बबन इंदूलकर, प्रकाश पाटील, जयसिंग पवार यांच्यासह पाटील सरांचे कुटुंबिय, भुदरगड तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




