*राजर्षी शाहूंनी धाडसी कृतीतून समाजपरिवर्तन घडवले : कुनिओ हारा*
*‘राजर्षी शाहू महाराज : एक संक्षिप्त चरित्र’च्या इंग्रजी आवृत्तीचे जपानी शिक्षणतज्ज्ञांकडून कौतुक*
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केवळ सामाजिक बदलाची चर्चा केली नाही, तर धाडसी निर्णय आणि प्रत्यक्ष कृतीतून समाजात परिवर्तन घडवून आणले. त्यांचे जीवन, तत्त्वज्ञान आणि दूरदृष्टी आजच्या काळातही तितकीच प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे, असे गौरवोद्गार जपानमधील शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, प्रेरणादायी वक्ते तथा ‘हो-मे-आय-कू’ ग्रुपचे संस्थापक कुनिओ हारा यांनी काढले.
कुनिओ हारा नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी ज्येष्ठ लेखक आणि राजर्षी शाहू अभ्यासक प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित ‘राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र’ या पुस्तकाची प्रा. डॉ. दिग्विजय पवार यांनी अनुवादित केलेली इंग्रजी आवृत्ती ‘Rajarshi Shahu Maharaj: A Concise Biography’ डॉ. पवार यांनी त्यांना भेट दिली. पुस्तकाचे सखोल वाचन केल्यानंतर हारा यांनी प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांना विशेष पत्र पाठवून पुस्तकातील विचार आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याविषयी आदर व्यक्त केला.
हारा यांनी पत्रात म्हटले आहे की, “Rajarshi Shahu Maharaj: A Concise Biography हे पुस्तक मी अत्यंत बारकाईने वाचले. त्यातील प्रत्येक प्रकरणाने मला अंतर्मुख केले आणि खोलवर प्रेरित केले. हे केवळ एका महान राजाचे चरित्र नसून, राजर्षी शाहू महाराजांचे जीवन, तत्त्वज्ञान आणि असाधारण दूरदृष्टी भावी पिढ्यांसाठी जतन करणारी एक अभ्यासपूर्ण कलाकृती आहे. त्यांनी केवळ परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त केली नाही, तर धाडसी कृतीतून सामाजिक परिवर्तन प्रत्यक्षात घडवून आणले.”
तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असलेल्या वर्तमान युगात राजर्षी शाहू महाराजांनी जपलेली करुणा, मानवी प्रतिष्ठा, सर्वसमावेशकता आणि शिक्षण ही मूल्ये अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे हारा यांनी नमूद केले.
ते पुढे लिहितात, “राजर्षी शाहू महाराजांचे तत्त्वज्ञान आजच्या काळाशी किती सुसंगत आहे, याचा मी पुस्तक वाचताना सातत्याने विचार करत होतो. त्यांच्या जीवनातून आपल्याला समजते की, नेतृत्वाचा खरा उद्देश स्वतःचा गौरव करणे नसून इतरांसाठी संधी निर्माण करणे हा आहे. आपण समाजाला ज्या स्थितीत पाहिले, त्यापेक्षा अधिक चांगल्या स्थितीत तो पुढील पिढीकडे सोपविणे, हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे.”
‘हो-मे-आय-कू’ आणि ‘कामी मेमो’ या शैक्षणिक संकल्पनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या हारा यांना राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांमध्ये आपल्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाशी अनेक समान मूल्ये आढळली.
“राजर्षी शाहू महाराजांप्रमाणेच माझाही ठाम विश्वास आहे की, शिक्षणाने विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देऊ नये. शिक्षणातून चारित्र्य, आत्मविश्वास, करुणा आणि आशावादी दृष्टिकोनाची निर्मिती झाली पाहिजे. हेच गुण एक सुसंस्कृत समाज आणि अधिक शांततापूर्ण जग निर्माण करू शकतात,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
वाठार येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला दिलेल्या भेटीचाही हारा यांनी पत्रात आवर्जून उल्लेख केला आहे. संस्थेमध्ये त्यांचा शैक्षणिक कार्यक्रम अधिकृत अभ्यासक्रमाचा भाग बनला असून, तेथील शैक्षणिक वातावरणात राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची अनुभूती आल्याचे त्यांनी सांगितले. एका शतकानंतरही त्यांची दूरदृष्टी शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करत आहे. काळाच्या सीमा ओलांडून पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणे, हेच एका खऱ्या महान नेत्याचे लक्षण आहे,” अशा शब्दांत कुनिओ हारा यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला.
*फोटो कॅप्शन* – जपानचे शिक्षणतज्ज्ञ कुनिओ हारा यांना राजर्षी शाहू महाराज संक्षिप्त चरित्र या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती भेट देताना प्राचार्य डॉ. जे. के. पवार, प्रा. डॉ. दिग्विजय पवार, प्रा. डॉ. सर्वजीत भोसले, परिनय जाधव.




