‘ए आय मुळे जग बदलेल : बदलत्या जगासाठी माणसाने स्वतःला तयार करावे.-श्री. विवेक सावंत , आय.टी. शिक्षण तज्ज्ञ, पुणे

Spread the news

 आय मुळे जग बदलेल बदलत्या जगासाठी माणसाने स्वतःला तयार करावे.

­

 

–         श्री. विवेक सावंत , आय.टी. शिक्षण तज्ज्ञ, पुणे

  •  

 

शिक्षणमहर्षी  डॉ. बापूजी साळुंखे यांचा 39 वा स्मृतिदिन साजरा.

कोल्हापूर, दि. ८ :  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर येथे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३९ वा स्मृतिदिन संपन्न झाला.  शिक्षण, तंत्रज्ञान आणि मूल्याधिष्ठित समाजनिर्मिती  या ध्येयाने प्रेरित होऊन शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी मोलाचे कार्य केले आहे. असे उदगार जागतिक कीर्तीचे आय.टी. तज्ञ व शिक्षणतज्ञ मा. विवेक सावंत यांनी यावेळी काढले. पुढे कार्यक्रमात श्री.  सावंत यांनी ‘ए.आय. आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षण, उद्योग, संशोधन आणि दैनंदिन जीवनातील वाढता प्रभाव स्पष्ट केला. शैक्षणिक क्षेत्रात ‘ए.आय.’ च्या प्रभावाने बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करून भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच “ए.आय. माणसाची जागा घेणार नाही; मात्र ‘ए.आय.’ चा प्रभावी वापर करणारा माणूस ‘ए.आय.’ चा वापर न करणाऱ्या माणसाची जागा घेऊ शकतो,” या आशयातून त्यांनी  बदलत्या तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. केवळ माहिती मिळविणे पुरेसे नसून त्या माहितीचे विश्लेषण करणे, प्रश्न विचारणे, सर्जनशील विचार करणे आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे ही भविष्यातील गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘ए.आय.’ मुळे काही पारंपरिक कामांचे स्वरूप बदलणार असले तरी त्याचबरोबर नवीन कौशल्ये, नवीन व्यवसाय आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा निष्क्रिय वापरकर्ता न बनता त्याचा सर्जनशील आणि जबाबदार वापर करणारा व्यक्ती बनले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या शिक्षणविचारांचा वारसा जपण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच ‘ए.आय.’ मुळे माणसातील सृजनशीलता, भावनिकता कमी होणार नाही याची काळजी घ्यावी असे विचार मांडले.

            यावेळी संस्थेतील ‘माझी शाळा सर्वोत्कृष्ट शाळा’ विभागीय पुरस्कार २०२६, डॉ. आप्पासाहेब पवार आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार,  स्वामी विवेकानंद विवेकरत्न गुरुदेव पुरस्कार, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे उत्कृष्ट लेखनिक पुरस्कार, भारतरत्न डॉ.सी.व्ही.रमण क्रियाशील प्रयोगशाळा सहायक परिचर पुरस्कार, डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छतादूत पुरस्कार या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

            यावेळी संस्थेच्या मिरज शाखेतील विद्यार्थी कु.देवांश गुरव आणि राजे विजयसिंह डफळे हायस्कूल,डफळापूरचे कला शिक्षक श्री. शरद शंकर कांबळे यांनी स्वामी विवेकानंद, डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे हस्तशिल्प तयार केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल,कोल्हापूर येथील विद्यार्थी कु. गोविंद बाबुराव गावडे  याने सलग तबला वादनात विश्वविक्रम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.  

तसेच एस.एस.सी. मार्च 2026 परीक्षेत संस्थेमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनीमध्ये प्रथम आलेली

1)     न्यू इंग्लिश स्कूल, रेंदाळची विद्यार्थिनी कु. बोळाज समृध्दी सोमनाथ ,

2)      न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी तारे चैतन्य्‍ उदय याचा संस्थेत सर्व विद्यार्थ्यांना प्रथम आल्याबद्दल ,

3)     स्वामी रामानंद भारती विद्यामंदीर, तासगावची विद्यार्थीनी कु. गायकवाड अनुष्का हणमंत हिचा संस्थेमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यात प्रथम आलेबद्दल  

त्यानंतर एच.सी.सी.बोर्ड, कोल्हापूर येथील परीक्षेतील  विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरचे  विद्याथी 

कु. मनुश्री प्रसन्न्‍ा – प्रथम ,   कु. दीक्षीत आर्या वरद  – व्दितीय  आणि संकपाळ अनिष आनंदा – तृतीय

आलेबद्दल  सत्कार करण्यात आला.

            माझी शाळा – सर्वोत्कृष्ठ् शाळा पुरस्कार सन  2024-25  सिध्दनाथ हायस्कूल, आरवडे यांना व  सन 2025-26 चा पुरस्कार छत्रपती शिवाजी हायस्कूल, भोर  यांना प्रत्येकी रोख रक्क्म रु. दोन लाख व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 

 दुपारच्या सत्रात मुख्याध्यापक चर्चासत्र आणि गुरुदेव कार्यकर्त्यांशी मा. विवेक सावंत यांचा संवाद उत्साहात पार पडला.

            कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्व्लन, प्रतिमापूजन व श्री. महेश हिरेमठ व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने व सुमधुर भक्तीगीतांनी झाली.  कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे प्रभारी सचिव प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी बदलत्या ज्ञानव्यवस्थेशी जुळवून घेण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील व डॉ. कविता तिवडे यांनी केले, तर आभार संस्थेच्या प्रशासन विभागाचे सहसचिव प्राचार्य सीताराम गवळी यांनी मानले.

याप्रसंगी संस्थेचे मुख्य्‍ कार्यकारी अधिकारी मा. श्री. कौस्तुभ गावडे, संस्थेचे उपाध्यक्ष मा. नामदेवराव कांबळे, संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख मा. श्री. श्रीराम साळुंखे, सर्व विभागप्रमुख, संस्थेचे आजीव सेवक, आजी माजी पदाधिकारी, शाखाप्रमुख, गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!