टाकळी एमआयडीसी प्रश्नासाठी शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट; प्रस्ताव रद्द करण्याचे आश्वासन- व्ही. बी. पाटील

Spread the news

 

­

 

टाकळी एमआयडीसी प्रश्नासाठी शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट; प्रस्ताव रद्द करण्याचे आश्वासन-
व्ही. बी. पाटील

  •  

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या चर्चेत असलेल्या टाकळी गावातील प्रस्तावित एमआयडीसीच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने आज, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता, सिल्व्हर ओक, मुंबई येथे पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेतली.

कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळी गाव हे सैनिकांचे गाव म्हणून महाराष्ट्रासह देशभरात परिचित आहे. अशा गावातील नागरिकांच्या लोकभावनेचा विचार न करता प्रस्तावित एमआयडीसीचा घाट घातला जात असल्याबाबत शिष्टमंडळाने पवार साहेबांचे लक्ष वेधले.

सदर जमीन गायरान असून ती गावाच्या लोकहितासाठी वापरण्यात यावी, तसेच त्या ठिकाणी सैनिक शाळा आणि सैनिकांच्या हिताशी संबंधित विविध उपक्रम उभारण्यात यावेत, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. स्थानिक नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणत्याही प्रकारे प्रकल्प लादू नये, अशी भूमिका शिष्टमंडळाने स्पष्ट केली.

तसेच, शिरोळ तालुक्यातील इतर एमआयडीसीची काय परिस्थिती आहे त्याचा प्रथम आढावा घेणे आवश्यक आहे. एमआयडीसी उभारायचीच असल्यास ती किमान ५०० एकर क्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने उभारण्यात यावी. विशेषतः टाकळी गावाचा मोठा भाग पावसाळ्यात पुराच्या पाण्याने वेढला जात असताना अशा ठिकाणी एमआयडीसी उभारण्याचा अट्टाहास का केला जात आहे, असा सवालही शिष्टमंडळाने उपस्थित केला.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रस्तावित एमआयडीसीला तीव्र विरोध करण्यात आला असून, गावातील वातावरण अधिक कलुषित होण्यापूर्वी शासनाने या प्रस्तावाचा पुनर्विचार करून तो रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्याकडे सदर प्रस्ताव रद्द करण्याबाबत विनंती करण्याची मागणी पवार साहेबांकडे करण्यात आली.

शिष्टमंडळाचे म्हणणे पवार साहेबांनी बारकाईने ऐकून घेतले. लोकभावनेचा आदर केला जाईल आणि टाकळी एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्याबाबत उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून योग्य ती भूमिका मांडली जाईल, असे स्पष्ट आश्वासन शरदचंद्रजी पवार साहेबांनी शिष्टमंडळाला दिले.

या भेटीस जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष तथा माजी महापौर आर. के. पोवार, राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. अनिल घाटगे, शहर सरचिटणीस गणेश जाधव आणि प्रदेश सचिव सुनील बोगाळे उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!