*गांधीनगरसह १३ गावांच्या सुधारीत प्रादेशिक योजनेच्या पाईपलाईनच्या कामात सुधारणा झाली नाही तर २१ सप्टेंबर रोजी जीवन प्राधिकरणाच्या दारात आंदोलन करण्याचा आमदार अमल महाडिक यांचा इशारा*
गांधीनगरसह १३ गावांसाठी पिण्याच्या पाईपलाईनच्या सुधार योजनेचं काम सुरू आहे. पण रेड्डीज नावाच्या ठेकेदाराकडून अत्यंत संथ गतीनं काम सुरू आहे. या कामात सुधारणा व्हावी. तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्यात येणार्या कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी आज संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता तुषार बुरूड, कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, उपअभियंता शिवाजी इंगवले, जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता माधुरी पाटील, उपअभियंता पी.एच.गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. गांधीनगर पाणी पुरवठा योजनेचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असून, पाईपलाईन टाकलेल्या रस्त्यावरच्या चरी मुजवलेल्या नाहीत. २३ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ ९ टाक्यांचं काम पूर्ण झालंय. त्यामुळं आमदार अमल महाडिक संतप्त झाले. त्यांनी संबंधीत ठेकेदार आणि अधिकार्यांना धारेवर धरलं.
चौकट
*येत्या १५ दिवसात ठेकेदार कंपनीनं कामात सुधारणा केली नाही तर २१ सप्टेंबरपासून १३ गावातील लोकांना घेवून जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा आमदार अमल महाडिक यांनी दिला.*
कामाच्या दर्जांबाबत तडजोड खपवून घेणार नाही, असंही आमदार महाडिक यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर शहरालगतचे रिंगरोड आणि गावांच्या बाहेरील बायपास रस्ता करता येईल का? याची पाहणी करा, असे आदेश आमदार महाडिक यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद अधिकारी यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील शाळा दत्तक घेवून सुधारणा कराव्यात. तसंच सार्वजनिक वाचनालयंही दत्तक घ्यावीत, असं आवाहन आमदार अमल महाडिक यांनी केलं.
गांधीनगर ही मुख्य बाजारपेठ असून तिथं सार्वजनिक शौचालयांचा अभाव आहे. त्यामुळं याठिकाणी शौचालय उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं लवकरात लवकर आराखडा बनवून द्यावा. त्यानंतर शौचालयं बांधून ते बिओटी तत्वावर चालवण्यासाठी दिलं जाईल, असंही महाडिक यांनी सांगितलं. यावेळी सागर भोगम, पंचायत समिती उपसभापती रूपाली पाटील, रवी मलानी यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.



