‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार – २०२६’ जाहीर
(आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे प्रकाशनार्थ जारी)
‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’च्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र’, मुंबई यांच्यातर्फे २००७ सालापासून दर वर्षी मराठीतील उत्कृष्ट अनुवादित ग्रंथास ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येते. कविवर्य विंदा करंदीकर यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतून साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टला दिलेल्या देणगीच्या व्याजातून इतर भाषेतून मराठीत अनुवादित झालेल्या उत्कृष्ट ग्रंथाला हा पुरस्कार दिला जावा अशी विनंती केली होती. त्यानुसार दरवर्षी विंदा करंदीकरांच्या जन्मदिनी म्हणजे २३ ऑगस्टला हा पुरस्कार घोषित केला जातो.
तज्ञ परीक्षकांतर्फे मराठीतील मागील दोन वर्षांत प्रकाशित झालेल्या अनुवादित ग्रंथांचा सखोल आढावा घेऊन या पुरस्काराकरिता ग्रंथाची निवड केली जाते, त्यानुसार या वर्षी हा पुरस्कार खालील दोन पुस्तकांना जाहीर करण्यात येत आहे.
‘पाळंमुळं’ – मूळ जर्मन लेखक : साशा स्टानिसिच,
जर्मन भाषेतून मराठी अनुवाद : जयश्री हरि जोशी, (प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे,२०२५)
‘त्सुबाकी स्टेशनर्स’ – मूळ जपानी लेखक : इतो ओगावा,
जपानी भाषेतून मराठी अनुवाद : मयुरेश कुलकर्णी, (प्रकाशक : कलासक्त, पुणे,२०२५)
या पुरस्कारासाठी तज्ञ परीक्षक म्हणून निखिलेश चित्रे (अध्यक्ष), करुणा गोखले आणि गणेश मतकरी यांनी काम पाहिले. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे असून एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार जयश्री हरि जोशी आणि मयुरेश कुलकर्णी या दोन अनुवादकांना दिला जाईल.
– प्रफुल्ल शिलेदार, अध्यक्ष – आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र



