जत / श्रीकृष्ण पाटील.
ब्रिटिश राजवटीत गोरगरीब लोकावर अत्याचार करणाऱ्या सावकारांना धडकी भरविणाऱ्या व ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या महान वीर क्रांतिकारक सिंदूर लक्ष्मण नाईक यांना ज्या जेलमध्ये कैद करून ठेवले होते तो जत येथील ब्रिटिशकालीन जुना जेल आजही महान क्रांतिकारी वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या पराक्रमाची साथ देत जत सांगली मार्गावर मोठया दिमाखात उभा आहे.
महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या सिंदूर या गावी या महान क्रांतिकारकाचा एका रामोशी कुटुंबात जन्म झाला.
लक्ष्मण हा लहानपणापासूनच चपळ होता.लक्ष्मण याने इंग्रजांची जुलमी राजवट आपल्या डोळ्यांनी पाहिली,
या राजवटीत सावकार हे गोगरीब लोकांच्यावर जुलूम, जबरदस्ती व अन्याय करून त्यांना त्रास देत असत हे पाहून लहान लक्ष्मण चे तरुण रक्त खवळत होते. लक्ष्मण याचे वडील हे ब्रिटिशांच्या राजवटीत कोतवालीचे काम पहात होते. शेतसारा वसुलीच्या नावाखाली ब्रिटिशांकडून गोरगरीब जनतेची होत असलेली पिळवणूक व सावकारांकडून होत असलेला जुलूम यामुळे लक्ष्मण याने ब्रिटिशांविरोधात संघर्ष सुरू केला. त्यांनी स्वतःची टोळी तयार केली व गोरगरीब लोकांना लुटणाऱ्या सावकारांना लुटून त्यांची संपत्ती गोरगरीब लोंकाना देण्याचे काम केले.
जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार लक्ष्मण नाईक हे एक वादळ होते.लक्ष्मण याची उंची सातफूट होती. शरीर पिळदार व बलदंड होते.लक्ष्मण जर पुढे चालत चालला असलातरी तो पळतोय का असे ब्रिटिशांना वाटत होते. लक्ष्मण हा पुढे पळत असताना त्याच्या पाठीमागे पाठलाग करणाऱ्या पोलिसांना रस्त्यात पडलेला दगड टाचेत धरून त्या पाठीमागे पळणाऱ्या पोलिसांचा कपाळमोक्ष करत. त्याचप्रमाणे जोराने पाळणाऱ्या घोड्याच्या पाठमागे वाऱ्याच्या वेगाने धावत जाऊन त्या घोड्यावर स्वार होऊन क्षणात दूर जात असत त्याच प्रमाणे दगडी भिंतीवर पाल ज्याप्रमाणे चढत जाते तसे लक्ष्मण भिंतीवर चढत असे.असा हा महापराक्रमी लक्ष्मण होता.
ब्रिटिश राजवटीत याच सिंदूर लक्ष्मणला जत येथील जेलसह कर्नाटकातील मोठया व भक्कम अशा हिंडलगा जेलमध्ये अटक करून ठेवले होते. परंतु सिंदूर लक्ष्मण व त्यांच्या टोळीने त्यांना ज्या ज्या जेलमध्ये कैद करून ठेवण्यात आले होते. ते सर्वच्या सर्व जेल फोडून आपली सुटका करून घेतली होती.
वीर क्रांतिकारी सिंदूरचा लक्ष्मण अशी ओळख लक्ष्मणने निर्माण केली होती.लक्ष्मण याच्या बाबतीत असेही बोलले जाते की ज्या वेळी ब्रिटिश पोलीस लक्ष्मण याच्या मागावर असत त्यावेळी लक्ष्मणला गोरगरीब लोक आश्रय देत अशा लोकांना लक्ष्मण सावकारांकडून लुटलेले सोने देऊन त्यांना मदत करीत असे.
ब्रिटिश राजवटीत महमद शेख या पोलीस अधिकाऱ्याने वीर सिंदूर लक्ष्मण याला पकडण्यासाठी दहाहजाराचे बक्षीस जाहीर केले होते.परंतु सिंदूर लक्ष्मण याने या अधिकाऱ्याचे शीर धडापासून वेगळे केले व जतच्या मोठया वेशीत टांगून आपली दहशत व दरारा ब्रिटशांना दाखवून दिला.
अशा या ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या महान क्रांतिकारक वीर सिंदूर लक्ष्मण याला इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्या जवळच्याच व्यक्तीकडून अमावसच्या रात्री जेवणाचा बेत ठरवून लक्ष्मण याच्या ताटासमोर कंदील ठेऊन पोलिसांकडून गोळ्यांचा वर्षाव करून त्यांचा शेवट केला.
अशा या महान क्रांतिकारकांचे त्यांच्या जन्मगावी सिंदूर या ठिकाणी सिंदूर लक्ष्मण यांचा पुतळा उभारला आहे. महाराष्ट्र सरकारने अशा या महान क्रांतिकारकाच्या स्मृती म्हणून सिंदूर या गावी भव्य असे वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या पराक्रमाच्या स्मृती जागविण्यासाठी भव्य दिव्य असे स्मारक उभे करावे अशी अपेक्षा जत तालुका वासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन थोरबोले साहेबांनी जत सांगली मार्गावर असलेल्या ब्रिटिशकालीन जुन्या जेलचा संपूर्ण कायापालट केला असून पूर्वी जसे जेलचे स्वरूप होते तसे स्वरूप या जेलला दिल्याने ब्रिटिशकालीन आठवणींना नव्याने उजाळा मिळाला आहे. व महान क्रांतिकारक वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या पराक्रमाच्या स्मृती जाग्या झाल्या आहेत.



