महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२६ चे मानकरी शिवाजी पोवार यांचा दिमाखात गौरव

Spread the news

महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२६ चे मानकरी शिवाजी पोवार यांचा दिमाखात गौरव

­

 

कागल : प्रतिनिधी

  •  

सामर्थ हायड्रोन्युमॅटिक ऑटोमेशन्स इंडिया, पुणे चे संचालक शिवाजी ज्ञानू पोवार यांना प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. Reseal.in यांच्या वतीने 1 सप्टेंबर २०२६ रोजी पुणे येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, व्यावसायिक यश आणि प्रेरणादायी कामगिरीची दखल घेऊन दरवर्षी या पुरस्कारांचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या सोहळ्याला उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्योग क्षेत्रातील अनुभवांची देवाण-घेवाण आणि मार्गदर्शनही करण्यात आले.

हा पुरस्कार प्रसिद्ध मराठी व हिंदी सिने अभिनेते जितेंद्र जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून Govt. GST Commissioner, UCO बँकेचे मॅनेजर, तसेच सिनेदिग्दर्शक सुधीर पाथाडे उपस्थित होते.

शेतकरी कुटुंबातून उद्योग विश्वापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

शिवाजी पोवार यांचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवाजी पोवार यांचे प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर शेंडूर आणि माध्यमिक शिक्षण मानव हायस्कूल शेंडूर येथे झाले. त्यानंतर त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

शिक्षणानंतर त्यांनी सलग १८ वर्षे विविध MNC कंपन्यांमध्ये मॅनेजर पदावर काम केले. या १८ वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर २०१४ साली त्यांनी कोणतेही आर्थिक व व्यावसायिक पाठबळ नसताना ‘समर्थ हायड्रोन्युमॅटिक ऑटोमेशन इंडिया’ या स्वतःच्या कंपनीची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात मोठा संघर्ष करावा लागला, मात्र न डगमगता त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे यश मिळत गेले.

आज एमआयडीसी, भोसरी, पुणे येथे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर ऑफिस आणि फॅक्टरी असून, कंपनीत ऑफिसमध्ये ५ आणि फॅक्टरीमध्ये १५ कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे. फॅक्टरीचे काम २४ तास सुरू असते. सध्या कंपनी भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी हायड्रोन्युमॅटिक ऑटोमेशनची कामे करत असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे.

या पुरस्कारामुळे शिवाजी पोवार यांच्या कार्यावर मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

– कागल प्रतिनिधी : अजित बोडके


Spread the news

You may also like

error: Content is protected !!